जळगाव – शहरातील गरजू कुटुंबांसाठी ममुराबाद रस्त्यावरील तब्बल ३१ गुंठे शासकीय जमिन म्हाडाकडे हस्तांतरीत करण्यात आली आहे. त्या जागेवर १४४ कुटुंबासाठी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून सहा मजली इमारत उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. हा प्रकल्प सध्या तांत्रिक मान्यतेच्या टप्प्यात असून, त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे.
पंतप्रधान आवास योजनेतून मंजूर घरकुलांच्या बांधकामासाठी जळगाव शहरात पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती. त्याचा विचार करून जळगाव शहरालगत ममुराबाद रस्त्यावर असलेला शासकीय भूखंड गट क्रमांक ४२०/अ चे ०.१५ गुंठे क्षेत्र आणि गट क्रमांक ४२१/अ चे ०.१६ गुंठे, असे एकूण ३१ गुंठे क्षेत्र नाशिक येथील गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडाळाच्या मुख्याधिकाऱ्यांकडे हस्तांतरित करण्याची कार्यवाही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मार्चमध्ये केली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे जळगाव शहरातील असंख्य लाभार्थ्यांना स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. महानगरपालिका क्षेत्रातील गरजू नागरिकांना परवडणाऱ्या घरांची सुविधा उपलब्ध करून देण्याचा मुख्य उद्देश त्या माध्यमातून जोपासला गेला.
म्हाडाची इमारती उभी राहिल्यानंतर कमी उत्पन्न गटातील तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना घरकुलाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यादृष्टीने शासनाने मोठे पाऊल टाकले आहे. यामुळे केवळ सामान्य नागरिकांना घरे मिळणार नाही, तर जळगाव शहराच्या नागरी वसाहतींच्या विकासालाही चालना मिळणार आहे. या प्रक्रियेअंतर्गत म्हाडा तांत्रिक मान्यता मिळाल्यावर लवकरच बांधकामाची रूपरेषा आखून पुढील कामकाज सुरू करणार असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून हस्तांतरीत झालेल्या ३१०० चौरस मीटर जागेवर म्हाडा साधारण सहा मजली इमारत उभारणार आहे. ज्यामध्ये १४४ कुटुंबे वास्तव्य करू शकतील.
जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तांतरीत केलेली ३१ गुंठे जमीन गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्याही वापराशिवाय पडून आहे. त्या जागेचा वापर परिसरातील नागरिक कचरा टाकण्यासाठी करतात. त्या ठिकाणी म्हाडाची इमारत उभी राहिल्यानंतर अस्वच्छतेचा प्रश्न देखील कायमचा निकाली निघणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने जळगाव ते किनगाव रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. या शिवाय तरसोद ते पाळधी बाह्यवळण महामार्ग कार्यान्वित झाल्याने ममुराबादकडे जळगाव शहर वाढण्याची चिन्हे दिसून आली आहेत. अशा स्थितीत, म्हाडाची सहा मजली इमारत उभी राहिल्यावर या परिसराचा आणखी झपाट्याने विकास होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून हस्तांतरीत ममुराबाद रस्त्यावरील ३१०० चौरस मीटर जागेवर प्रस्तावित सहा मजली इमारतीसाठी तांत्रिक मान्यता घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर बांधकामाची रूपरेषा आखून पुढील कामकाज सुरू होईल. – अमोल बिलसोरे (प्रभारी उपअभियंता- म्हाडा, जळगाव)