मतदानानंतर उमेदवारांचा दिवस

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दीड महिन्यापासून स्वत:ला झोकून देणाऱ्या उमेदवारांनी मतदानानंतरचा दिवस थकवा, शीण घालविण्याबरोबर कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे आभार मानण्यात व्यतीत केला. रणरणत्या उन्हात प्रचार करताना सर्वाची इतकी दमछाक झाली की, मतदानानंतर दुसऱ्या दिवशी काहींना घराबाहेर पडावेसे वाटले नाही. तर काहींनी भल्या सकाळी ईव्हीएम यंत्र ज्या अंबड येथील गोदामात ठेवले आहेत, तिथे भेट देऊन पाहणी केली. काहींनी उशिराने घराबाहेर पडत भेटीगाठी सुरू केल्या. मतदानाची अंतिम आकडेवारी हाती आल्यामुळे प्रत्येकाने आपणास कुठे कमी, कुठे जास्त मते मिळाली असतील याची आकडेमोड करण्यास प्राधान्य दिले आहे.

नाशिक मतदारसंघात सर्वाधिक १८, तर दिंडोरीत आठ उमेदवार रिंगणात होते. रणरणत्या उन्हात सव्वा ते दीड महिने केलेल्या प्रचारात उमेदवारांना विविध घटकांचे सहकार्य मिळाले. त्यांचे आभार मानण्यास काही उमेदवारांनी सुरुवात केली. दुसरीकडे २२ दिवसानंतर होणाऱ्या मतमोजणीची उत्सुकता, चिंता काहींच्या चेहऱ्यावर दिसत होती. काहींनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत विश्रांती करणे पसंत केले.

नाशिक लोकसभा मतदारसंघात सहा तर दिंडोरीमध्ये नऊ तालुक्यांचा समावेश आहे. नाशिकच्या तुलनेत दिंडोरी मतदारसंघ आकाराने मोठा आहे. गावोगावच्या मतदारापर्यंत पोहोचताना उमेदवारांची दमछाक झाली. तळपत्या उन्हात प्रचार करणे प्रत्येकासाठी आव्हान होते. अधिकाधिक मतदारापर्यंत पोहोचताना कोणी कसर सोडली नाही.

दररोज १५ ते १६ तास प्रचारात गुंतलेल्या उमेदवारांची मंगळवारची सकाळ उशिराच झाली. अनेकांनी भ्रमणध्वनीवर कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून आभार मानण्यास प्राधान्य दिले.

महाआघाडीचे नाशिकमधील उमेदवार समीर भुजबळ यांची नेहमीप्रमाणे पहाटे साडेपाच वाजताच सकाळ झाली. पायी फिरण्याचा व्यायाम त्यांनी केला. मतदान प्रक्रियेनंतर सर्व ईव्हीएम यंत्रे ठेवण्यात आलेल्या अंबडच्या गोदामात निवडणूक शाखेने सर्व उमेदवारांना बोलावले होते. भुजबळ यांनी भेट देऊन माहिती घेतली. त्यानंतर दिवसभर भुजबळ फार्मवर वेगवेगळ्या भागातून भेटण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करत कुठून कसे मतदान झाले, हे जाणून घेतले. दिंडोरीचे महाआघाडीचे उमेदवार धनराज महाले मंगळवारी घराबाहेरच पडले नाहीत. विविध भागातून आलेले कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे आभार मानण्यास त्यांनी प्राधान्य दिले. मतदान कसे झाले, त्याचा कसा परिणाम होईल, याबद्दल त्यांनी संबंधितांशी चर्चा केली. बुधवारपासून प्रत्येक तालुक्यात भेट देऊन आभार मानण्याचा दौरा सुरू होणार असल्याचे महाले यांनी सांगितले.

प्रचारात अनेकांनी मेहनत घेतली, त्यांचे आभार मानणे आपले कर्तव्य असल्याची भावना उमेदवार व्यक्त करीत आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या काळात प्रचारार्थ ध्वनिक्षेपक असणारी वाहने भाडेतत्त्वावर घेणे, प्रचार कार्यालय थाटणे, प्रचार पत्रकांची छपाई आदी कामे केली गेली. मतदानानंतर या कामांची, सेवांची देयके देण्याचे कामही लगोलग उमेदवारांना हाती घ्यावे लागले आहे. या देयकांची माहिती घेऊन ते हिशेब मिटविण्याचे काम केले जाणार असल्याचे काहींनी सांगितले.

सुमारे सव्वा महिन्यांपासून प्रचारार्थ चाललेली धावपळ संपुष्टात आल्यामुळे आता शीण घालविण्याचे काम सुरू आहे. दररोज पाच, साडेपाच वाजता उठून सहा-साडेसहाला घराबाहेर पडायचो. मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीची सकाळ काहीशी उशिराने झाली. दूरध्वनीसह प्रत्यक्ष भेटून आभार मानण्याचे काम सुरू केले. त्या अनुषंगाने गाठीभेटी सुरू आहेत. धावपळीचा ताण कमी झाल्याचे जाणवत आहे.

– हेमंत गोडसे (महायुती)