महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे खासगी रुग्णालयांना निर्देश; महापालिकेकडून ९६ खासगी रुग्णालयांची तपासणी
शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ‘एन १ एलआयझा’ चाचणीच्या आधारे डेंग्यूचे निदान करावे, असे निर्देश महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने खासगी रुग्णालयांना दिले आहेत. त्यामुळे डेंग्यूच्या आजाराच्या निदानासाठी कार्ड चाचणीचा आधार घेणाऱ्या खासजी रुग्णालयांना चपराक बसली आहे.
शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढण्यामागे खासगी रुग्णालयांनी या आजाराच्या निदानासाठी अवलंबलेल्या चाचणीच्या कार्यपद्धतीमुळे हातभार लागल्याचे उघड झाले आहे. ‘कार्ड’ चाचणीच्या आधारे खासगी डॉक्टर, रुग्णालये डेंग्यू संशयित रुग्ण म्हणून उपचार करतात. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हा विषय स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थि झाला होता. खासगी रुग्णालये रुग्णांना भीती घालून प्रचंड लूटमार करत असल्याचा आरोप नगरसेवक समीर कांबळे यांनी या वेळी केला होता. त्यावर माहिती देताना वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन रावते यांनी आठवडाभरात केलेल्या कामाचा अहवाल मांडला. सहा पथके दररोज तीन-चार तास खासगी रुग्णालयांची तपासणी करीत आहेत. आतापर्यंत ९६ खासगी रुग्णालयांना भेट देत १४८ डेंग्यू रुग्णांची माहिती संकलित करण्यात आली.
त्या आधारे संबंधितांच्या घर परिसरात डासप्रतिबंधक उपाय केले जात आहेत. खासगी रुग्णालयांशी समन्वय राखण्यासाठी ‘व्हॉट्स अॅप’ गट तयार करण्यात आला. डेंग्यूशी निगडित चाचणी अहवाल ई-मेलवर पाठविण्याचे निर्देश देण्यात आले. रुग्णालयांचे नोंदणी प्रमाणपत्र वा तत्सम बाबींची छाननी केली जाते. खासगी रुग्णालये कार्ड चाचणीच्या आधारे रुग्णाची डेंग्यू संशयित म्हणून नोंद करतात. हे अयोग्य असून संबंधितांनी एलआयझा चाचणी सकारात्मक आल्यास डेंग्यू संशयित रुग्ण मानावे असे निर्देश देण्यात आले. संशयित रुग्णांचे घर परिसर, इमारती आणि सार्वजनिक ठिकाणी जनजागृतीचे काम समांतरपणे सुरू असल्याचे रावते यांनी सांगितले.
सर्वेक्षणात अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्याकडे कांबळे यांनी लक्ष वेधले. अनेक रुग्णालयात नोंदणीकृत क्षमतेहून अधिक खाटा टाकून अतिरिक्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तळघरात काही रुग्णालये सुरू होती. काही रुग्णालय परिसरात डेंग्यूचे डास आढळले. मात्र, त्यानंतर खासगी रुग्णालयांविरोधात धडक मोहीम हाती घेतल्याने संबंधितांचे धाबे दणाणले. डेंग्यू रुग्णांची संख्या आणि या आजाराच्या नावाखाली लूटमार कमी करण्यात यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले. या कामगिरीबद्दल स्थायी सभापती उद्धव निमसे आणि सदस्यांनी पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, वैद्यकीय अधिकारी रावते यांच्यासह अधिकाऱ्यांचे बाके वाजवून अभिनंदन केले. मात्र, रुग्णालय तपासणीत कोणतीच अनियमितता आढळली नसल्याचे या विभागाने म्हटल्याने नगरसेवक आणि प्रशासनातील विरोधाभास उघड झाला आहे.
वर्षभरात १०२५ जणांना डेंग्यूची लागण
वैद्यकीय विभागाच्या माहितीनुसार या वर्षांत आतापर्यंत १०२५ जणांना डेंग्यूची लागण झाली. यामध्ये डिसेंबर महिन्यात १५४ जणांची चाचणी सकारात्मक आली. डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णाच्या घर परिसरात डासप्रतिबंधक उपाययोजना केल्या जातात. नागरिकांमध्ये जनजागृती केली जाते. शहरात आतापर्यंत सुमारे ६० हजार ठिकाणे डास उत्पत्तीस्थाने आढळली असून १५ हजारहून अधिक ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले. डासांची उत्पत्ती आढळल्याने १०९ हून अधिक नागरिकांना दंडही करण्यात आला. ही कार्यवाही प्रगतिपथावर असल्याचे वैद्यकीय विभागाने म्हटले आहे.