करोना बैठकीचे निमंत्रण नसल्याने बाजू मांडता आला नाही; आरोग्य विद्यापीठाचा दावा

अनिकेत साठे, लोकसत्ता

नाशिक : करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे काम कुठेही दिसत नसल्याचा आक्षेप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे झालेल्या ज्या आढावा बैठकीत नोंदविला, त्या बैठकीचे आरोग्य विद्यापीठास निमंत्रण दिले गेले नसल्याचे उघड झाले आहे. बैठकीचे निमंत्रण मिळाले असते तर दुसरी बाजू त्याच वेळी मांडता आली असती, असे आरोग्य विद्यापीठाने म्हटले आहे. विद्यापीठास आता लेखी स्वरूपात आपले कामकाज मांडण्याची धडपड करावी लागली आहे.

शरद पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत तीन दिवसांपूर्वी करोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक झाली. या वेळी करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना, खासगी डॉक्टराचे असहकार्य, महापालिका-जिल्हा प्रशासनाचे नियोजन, खाटांची व्यवस्था, खासगी रुग्णालयांकडून अवास्तव देयक आकारणी यावर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली. प्रशासनाकडून सादरीकरण सुरू असताना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा विषय निघाला. आरोग्य विद्यापीठ म्हणजे वैद्यकीय शिक्षण देणारे राज्याचे मुख्य केंद्र. करोनाकाळात त्यांचे कुठेही काम दिसत नसल्याकडे पवार यांनी लक्ष वेधले होते. नाशिकला आरोग्य विद्यापीठ व्हावे, अशी नाशिककरांची मागणी होती. त्यांचा आग्रह विद्यापीठाच्या रूपाने पूर्ण झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. या विधानाचा धागा पकडून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विद्यापीठ, वैद्यकीय महाविद्यालय यांचे अधिकारी, कर्मचारी शिक्षण क्षेत्रातील असले तरी ते डॉक्टरच आहेत.   त्यांचा तातडीने सहभाग घ्यायला हवा, असे सूचित केले. डॉक्टर तयार करण्यासाठी राज्य सरकार शिष्यवृत्ती, तत्सम बाबींवर चार ते पाच लाख रुपये खर्च करते. संकटकाळात त्यांच्याकडून समाजोपयोगी काम घडले नाही

तर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. या मुद्यावर बैठकीत लगेचच उत्तर मिळाले नाही. आरोग्य विद्यापीठाचे कुणीही बैठकीत उपस्थित नव्हते. बैठकीतील माहिती प्रसिद्ध झाल्यानंतर अशी काही बैठक झाली, हे आरोग्य विद्यापीठास समजले. या बैठकीचे आम्हाला निमंत्रणच नव्हते, असे आरोग्य विद्यापीठाने म्हटले आहे. निमंत्रण मिळाले असते तर त्याच वेळी विद्यापीठाने केलेले काम, विद्यापीठाची सद्य:स्थिती मांडता आली असती. निमंत्रणाअभावी दुसरी बाजू लगेच मांडता आली नाही. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी नंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांची संपर्क कार्यालयात भेट घेतली. नाशिकमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय पदव्युत्तर महाविद्यालय तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे येथील आयुर्वेद, होमिओपॅथी आणि भौतिक उपचार महाविद्यालय सुरू करण्याबाबत चर्चा झाल्याचे भुजबळ यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.

लेखी स्वरुपात दुसरी बाजू

करोनाकाळात विद्यापीठाने केलेल्या कामांचा सविस्तर अहवाल लेखी स्वरूपात सादर करण्यात आला. शरद पवार यांच्यासह आरोग्यमंत्र्यांनाही विद्यापीठाने तो पाठविला आहे. निमंत्रण नसल्याने आरोग्य विद्यापीठास लेखी स्वरूपात आपली बाजू मांडावी लागली.

बैठकीत आरोग्य विद्यापीठाच्या कामावर कोणताही आक्षेप घेण्यात आलेला नाही. विविध विभागांशी संबंधित २९ सूचना करण्यात आल्या. बैठकीत प्रत्येक विभागास बोलावणे शक्य नसते. ठराविक व्यक्तींची ती बैठक होती. सुरक्षित अंतर आणि इतरही बाबी महत्वाच्या होत्या. आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी आपली नंतर चर्चा झाली. विद्यापीठात केवळ चार डॉक्टर असून वैद्यकीय मनुष्यबळ नाही. विद्यापीठाचे स्वरुप प्रशासकीय कार्यालयासारखे आहे. करोनाकाळात विद्यापीठाची काय मदत होवू शकते याबाबत कुलगुरूंशी चर्चा करण्यात आली आहे.

– सूरज मांढरे (जिल्हाधिकारी, नाशिक)