काँग्रेस-शिवसेना व इतरांमध्ये चुरस

महापालिकेच्या महापौर-उपमहापौरपदासाठी बुधवारी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक होत आहे. त्रिशंकू महापालिकेत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसले तरी सत्तेच्या जवळ पोहोचलेल्या काँग्रेस-शिवसेना आघाडीचे भवितव्य विरोधकांच्या समीकरणांवर अवलंबून आहे.

गेल्या महिन्यात झालेल्या येथील महापालिकेच्या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळू शकले नाही. या त्रिशंकू महापालिकेत ८४ पैकी सर्वाधिक २८ जागा जिंकणारी काँग्रेस आणि २७ जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादी-जनता दल युतीमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी मोठी स्पर्धा सुरू झाली होती. बहुमताचा ४३ हा आकडा गाठण्यासाठी तेरा जागा मिळविणारी शिवसेना, नऊ जागा मिळविणारा भाजप व सात जागा मिळविणारा एआयएम या तिन्ही पक्षांची मदत मिळविण्यासाठी दोन्ही काँग्रेसकडून प्रयत्न सुरू झाले. त्यात शिवसेनेची साथ मिळविण्यात काँग्रेस यशस्वी झाल्याने काँग्रेस-सेना आघाडी बहुमताच्या जवळ पोहोचली आहे.

दुसऱ्या बाजुला राष्ट्रवादी काँग्रेस-जनता दल युती, भाजप व एमआयएम हे तीनही पक्ष एकत्र आले तरच त्यांना बहुमताचा ४३ हा आकडा गाठणे शक्य होणार आहे परंतु, एमआयएमबरोबर जाणे भाजपला अवघड होणार असल्याने भाजपने पाठिंब्यासाठीचा निर्णय अजून जाहीर केला नाही. शिवाय या निवडणुकीत तटस्थ राहण्याची एमआयएमची भूमिका असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादीपुढील अडचणी वाढल्या आहेत. मात्र असे असले तरी सत्तेसाठी शेवटच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादीने प्रयत्न सुरूच ठेवले आहेत.

राष्ट्रवादीतर्फे नबी अहमद हे महापौरपदाचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. काँग्रेस व सेनेतर्फे आपापल्या सदस्यांना पक्षादेश बजावण्यात आला आहे. बुधवारी सकाळी ११ वा पालिका सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. निवडणुकीत कोणताही दगाफटका नको म्हणून विविध पक्षांनी आपापल्या सदस्यांना एकत्रितरीत्या पर्यटनास पाठविल्याचे सांगण्यात येते.