महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाकडून टेम्पो ट्रॅव्हल व्यवसायासाठी दोघांच्या नावे १८ लाखाचे कर्ज काढून त्या रकमेचा परस्पर अपहार करत फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांनी एका संशयिताला अटक केली.
त्रिमूर्ती चौक परिसरात राहणारे उत्तम पवार (५६) यांचा जुने नाशिक परिसरात वाहन व्यवसाय करणारा संशयित रामकिसन चव्हाण व शिवाजी कानडे यांच्याशी परिचय होता. संशयितांनी पवार व त्यांचे मित्र नारायण हिरे यांना २००७ मध्ये नाशिक-पुणे महामार्गावरील महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाकडून टेम्पो व्यवसायासाठी वाहन कर्ज काढून देतो असे सांगितले. कर्जासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे पवार व हिरे यांनी संशयितांकडे देत प्रस्ताव महामंडळाकडे दाखल केला. या संदर्भातील कागदपत्रांवर स्वाक्षरीही केल्याने महामंडळाने दोन टप्प्यात १८ लाखांचे कर्ज मंजूर करून दिले. मंडळाने प्रत्येकी नऊ लाख रुपयांचे धनादेश दिले. संशयितांनी ते बँकेतून वटविले आणि ही संपुर्ण रक्कम ताब्यात घेत तिचा परस्पर अपहार केला. या कालावधीत पवार व हिरे यांना संशयितांनी कर्ज मंजूर झाल्याने काहीही सांगितले नाही. मंडळाकडून कर्ज न भरल्यामुळे विचारणा झाली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकरणातील कानडे हा मयत झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. तर मुख्य संशयित चव्हाणला भद्रकाली पोलिसांनी अटक केली.
न्यायालयाने त्यास दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. अपहार व फसवणूक केल्याप्रकरणी पवार यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर ही कारवाई झाली.