नाशिक जिल्ह्यातील मनमाड उपजिल्हारुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिका यांना झालेल्या मारहाणीचे तीव्र पडसाद मनमाडसह संपूर्ण जिल्ह्यात उमटताना दिसत आहेत. महिला रुग्णास उपचारासाठी दाखल करुन न घेतल्यामुळे संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांनी रविवारी डॉक्टर आणि परिचारिका यांना मारहाण केली होती. यापार्श्वभूमीवर मनमाडसह संपूर्ण जिल्ह्यातील डाँक्टरांनी या मारहाणीच्या निषेधार्थ बंद पुकारला होता. दुपारपर्यंत शासकीय रुग्णालय व आरोग्य केंद्रामध्ये बाह्यरुग्ण सेवा बंद करण्यात आली होती. डॉक्टरांच्या या भूमिकेमुळे येथील रुग्णांचे प्रचंड हाल झाले.  रूग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना इतर रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनमाड येथील डॉक्टर व नर्सला मारहाण केल्याप्रकरणी मनमाड पोलिसांनी ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुमताज शेख या महिलेस जुलाब होत असल्याने त्यांचावर मनमाड उपजिल्हारुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, या रुग्णाला रुग्णालयात दाखल करून घ्या, असा आग्रह त्यांच्या नातेवाईकांनी लावून धरला. पण, डॉक्टरांनी या रुग्णाला अॅडमिट करण्याची करण्याची गरज नसल्याचे सांगितले. डॉक्टरांच्या या सल्लानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी संतप्त होऊन डॉक्टर संदीप घोंगडे व नर्स शोभा आहिरे यांना मारहाण केली. याप्रकरणी डॉ. संदीप घोंगडे यांनी मनमाड पोलिसांत फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून मुमताज शेख, बबलू सय्यद व एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीच्या घटनेमुळे डॉक्टर व परिचारकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असला तरी पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपींना अटक केली आहे. तरी देखील डॉक्टरांनी सोमवारी संप पुकारून येथील रुग्णांना वेठीस धरल्याची तक्रार येथील रुग्णांकडून व त्यांच्या नातेवाईकांकडून व्यक्त करण्यात आली. त्यानंतर दुपारच्या सुमारास डॉक्टरांनी अखेर संप मागे घेतला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manmad hospital doctors attack three arrested by nashik police
First published on: 08-05-2017 at 16:42 IST