नाशिककरांची राज्यराणी एक्स्प्रेस मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनल्सपर्यंत नेण्याची मागणी मान्य झाल्याने स्थानिकांना आता थेट पोहोचता येणार आहे. सोमवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी झाल्याने प्रवाशांनी आनंदोत्सव साजरा केला. दुसरीकडे या निर्णयामुळे मुंबईतील पाच उपनगरीय सेवांना फटका बसणार असल्याने त्यास विरोध दर्शविला जात असल्याने राज्यराणीचा प्रवास पुढील प्रवास कसा होतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
मनमाड-नाशिक परिसरातून दर दिवशी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वपूर्ण असलेली मनमाड-मुंबई राज्यराणी एक्सप्रेस ही लोकमान्य टिळक टर्मिनसपर्यंत जात होती. यामुळे प्रवाशांना छत्रपती शिवाजी टर्मिनस अथवा ठाणे गाठण्यासाठी उपनगरीय गाडीचा आधार घेणे भाग पडत होते. परतीच्या प्रवासातही हाच द्राविडी प्राणायाम करावा लागत असल्याने राज्यराणीला छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत न्यावे ही मागणी सर्वाकडून केली जात होती. त्याची दखल घेत उपरोक्त निर्णयास रेल्वे प्रशासनाने हिरवा कंदिल दाखविला. सोमवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. तीन वर्षांपासून प्रलंबित मागणी मान्य झाल्यामुळे या दिवशी नाशिकरोड रेल्वे स्थानक परिसरात उत्साहाचे वातावरण होते. मनमाडहून आलेल्या राज्यराणीचे नाशिकरोड रेल्वे स्थानकात ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. फुलांनी तिला सजविण्यात आले होते. यानिमित्ताने पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. खा. हेमंत गोडसे यांनी प्रवाशांशी चर्चा करत इतर अडचणी समजून घेतल्या. इगतपुरी येथेही एक्सप्रेसचे असेच स्वागत झाले. लवकरच ठाणे-दादर या ठिकाणी तिला थांबा मिळणार आहे. या दृष्टीने दिल्ली दरबारी प्रयत्न सुरू असल्याचे खा. गोडसे यांनी सांगितले. यावेळी आ. राजाभाऊ वाजे, राजेश ढोकणे आदी उपस्थित होते. प्रवाशांची मागणी मान्य झाली असली तरी राज्य राणी शिवाजी टर्मिनसवर जात असल्याने ऐन गर्दीच्या वेळी सुटणाऱ्या पाच उपनगरीय सेवावर त्याचा परिणाम होणार आहे. यामुळे मुंबईकरांचा त्यास विरोध आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manmad rajya rani express extended to cst mumbai
First published on: 13-10-2015 at 05:11 IST