नाशिक : भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या वातावरणात समाज माध्यमांवर युध्दखोरीचा महापूर आला आहे. देशातील युवकांनी अशी विधाने करण्याऐवजी  सीमेवर जाऊन लढावे. समाज माध्यमांवरून विधाने करणे सोपे असते, तितके युध्द प्रत्यक्षात सोपे नसते. त्यात मोठे नुकसान होते. यामुळे आम्हांला युध्द नको, तशी भाषाही नको, अशी भावना जम्मू-काश्मीर येथे हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेले स्क्वॉड्रन लिडर निनाद मांडवगणे यांच्या पत्नी विजेता यांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुधवारी जम्मू-काश्मीरमधील बडगाम येथे हवाई दलाचे एम आय-१७ हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाले. त्यात येथील स्क्वॉड्रन लिडर निनाद यांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना घडली, तेव्हा त्यांचे कुटुंबिय लखनौमध्ये होते. गुरूवारी मांडवगणे कुटुंबिय येथे दाखल झाले. निनाद यांचे पार्थिव रात्री आणल्यावर शुक्रवारी सकाळी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे. निनाद यांच्या पश्चात पत्नी विजेता, दोन वर्षीय कन्या, वडील अनिल आणि आई सुषमा असा परिवार आहे. आभाळ कोसळूनही कुटुंबियांनी धिरोदत्तपणाचे दर्शन घडवले. डोळ्यांत अश्रु येऊ न देता निनादचा अभिमान असल्याचे कुटुंबियांनी सांगितले. विजेता यांनी समाज माध्यमांवर चाललेल्या युध्दखोरीच्या विधानांवरील आपली अस्वस्थता व्यक्त केली. निनाद देशासाठी शहीद झाले. त्यांचा आम्हांला अभिमान असल्याचे त्यांनी नमूद केले. निनादचे वडील अनिल यांनी मुलाने अखेपर्यंत देशसेवेला प्राधान्य दिल्याचे नमूद केले निनादला व्यावसायिक वैमानिक होण्याची संधी होती. परंतु, तो हवाई दलात कार्यरत राहिला. तिथे काम करतांना तो नेहमी मजेत असल्याचे सांगायचा, अशी आठवणही त्यांनी सांगितली. आई सुषमा यांनी निनादची पत्नी आणि कन्या यांची जबाबदारी समर्थपणे पेलणार असल्याचे सांगितले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Martyr pilot ninad mandavgane wife not want war against pakistan
First published on: 01-03-2019 at 02:25 IST