जाणीवपूर्वक दोनदा नावे ठेवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार; जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचा इशारा

नाशिक : दोन ठिकाणी मतदान करण्याच्या उद्देशाने मतदार यादीत जाणीवपूर्वक दुबार नावे ठेवणाऱ्यांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मतदार यादी शुद्धीकरण मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत मतदार याद्यांमधील दुबार नावे वा तत्सम बाबींची पडताळणी करण्यात येणार आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

अलीकडेच शिवसेनेने शहरातील तीन विधानसभा मतदारसंघांत इतर मतदारसंघांतील दोन लाख ८७ हजारहून अधिक दुबार नावे हेतुत: घुसविण्यात आल्याची तक्रार राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती. त्याबाबतचे पुरावेही सादर केल्याचे सेना पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

त्यात नाशिक पश्चिम मतदारसंघात सर्वाधिक १२२२४२ नाशिक पूर्वमध्ये ८८९३२, तर नाशिक पूर्वमध्ये ७६३१९ दुबार (बनावट) नावे घुसविण्यात आली. त्याचाच फायदा घेऊन नाशकात भाजपचे तीन आमदार आणि ६६ नगरसेवक निवडून आल्याचा आरोपही सेना पदाधिकारी करीत आहेत.

आगामी महापालिका

निवडणुका पारदर्शी पद्धतीने व्हाव्यात, यासाठी दुबार नावे वगळण्याची मागणी करण्यात आली होती. या घटनाक्रमानंतर प्रशासनाने तातडीने मतदार यादी शुद्धीकरण मोहीम हाती घेतली.

दुबार नावांबाबत तक्रारी प्राप्त झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केले. या तक्रारींची शहानिशा केली जात आहे. केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या मदतीने ही मोहीम राबविली जाईल. गरज भासल्यास जास्तीचे मनुष्यबळ देण्यात येईल. आपले नाव मतदार यादीत असणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे. मतदार यादीतील नोंदणीबाबत कायद्यातील तरतुदी स्पष्ट आहेत.

कुणी दोन ठिकाणी मतदान करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक यादीत दोनदा नाव ठेवल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे मांढरे यांनी सूचित केले.

आपल्या भागातील मतदान केंद्रांवर नागरिकांनी तातडीने संपर्क साधून नावाची पडताळणी करावी. निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ तसेच मदतवाहिनीवर संपर्क साधून मतदारांनी आपल्या नावाची खातरजमा करावी. आपले नाव दुबार यादीत नसल्याची खात्री करता येईल. ज्यांनी मुद्दाम दुबार नावे ठेवली असतील, त्यांना कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे लागू शकते.

– सूरज मांढरे (जिल्हाधिकारी, नाशिक)