पेठ रस्त्यावर तणाव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक : पंचवटी परिसरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून मंगळवारी रात्री दुचाकीवरून घरी निघालेल्या भाजी विक्रेत्याची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली. राजेश शिंदे  (३३, बाळकृष्णनगर, पेठ रस्ता) असे मयताचे नाव आहे. पेठ रस्त्यावरील प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर ही घटना घडली. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मृताच्या संतप्त नातेवाईकांनी बुधवारी पेठ रस्त्यावर ठिय्या देऊन हल्लेखोरांवर कारवाई होईपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका घेतली होती. पोलिसांनी संशयितांना अटक करण्याची ग्वाही दिल्यानंतर अखेर बंदोबस्तात अंतिम संस्कार करण्यात आले.

सराईत गुन्हेगार आणि पोलिसाचा मुलगा प्रविण काकड याचा म्हसरूळ-आडगाव रस्त्यावर खून झाल्यानंतर पाठोपाठ भाजी विक्रेत्याच्या हत्येचा प्रकार घडला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याचा व्यवसाय करणारे शिंदे रात्री घरी परतत होते. संशयितांनी रस्त्यात वाहन अडवून हल्ला केला, दगडांनी मारहाण करण्यात आली. त्यातच शिंदे यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पंचवटी पोलीस ठाण्यातील पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या संदर्भात मृत शिंदे यांची पत्नी आरती शिंदे यांनी पूर्वीच्या वादातून ही घटना घडल्याचा संशय व्यक्त करीत तक्रार दिली आहे. सहा संशयितांची नांवे तक्रारीत दिली आहे. त्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची माहिती समजल्यानंतर बुधवारी फुलेनगर, भराड वस्ती परिसरात नातेवाईकांचा मोठा जमाव जमला. पेठ रस्त्यावर ठिय्या दिल्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. अखेरीस पेठ रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गावरून वळविण्यात आली. संशयितांना अटक करत नाही तोपर्यंत पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार नसल्याचा पवित्रा संबंधितांनी घेतला. बराच वेळ हा गोंधळ सुरू होता. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलीस अधिकाऱ्यांनी नातेवाईकांची समजून काढली. संशयितांना शक्य तितक्या लवकर अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी तयार झाले. बंदोबस्तात अंत्ययात्रा काढून अंतिम संस्कार करण्यात आले. या घटनाक्रमामुळे दुपापर्यंत या भागात तणावाचे वातावरण होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murder vegetable seller panchavati ysh
First published on: 25-11-2021 at 00:51 IST