नंदुरबार – आदिवासी विकास विभागाच्या तळोदा प्रकल्पातील १२ शासकीय आश्रमशाळांमध्ये राबविल्या जात असलेल्या पारेषणशी संलग्न सौर सयंत्र प्रकल्पात ठेकेदारांनी लिथियम बॅटरीऐवजी साध्या बॅटरीचा वापर करुन लाखो रुपयांचा गैरव्यवहार केला आहे. यामुळे निर्माण होणाऱ्या विजेचा आश्रमशाळांना फारसा उपयोग होणार नसल्याने या प्रकल्पाच्या उपयोगितेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या संपूर्ण प्रकरणाची तपासणी करण्याचा निर्णय तळोदा प्रकल्प प्रमुखांनी घेतला आहे.

तळोदा प्रकल्पातील आश्रमशाळांमध्ये सौर सयंत्र बसविण्याच्या योजनेला फेब्रुवारी २०२४ मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. आदिवासी विकास विभाग ही योजना सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाकडून राबवून घेत आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबवून चार ठेकेदारांना १२ आश्रमशाळांचे काम देण्यात आले. निविदेनुसार एक कोटी ८७ लाख ५५ हजार ७७२ रुपयांच्या या कामात लोभाणी, बिजरी, भगदरी, सलसाडी, मोरंबा, सरी, राणीपूर (प्रत्येकी आठ किलोवॅट), मांडवी (१०), भांग्रापाणी (नऊ) , तालंबा (१०), अलीविहीर (नऊ) आणि डाब (नऊ किलोवॅट) अशा १२ आश्रमशाळांमध्ये सौर संयत्र बसविले जाणार होते. यातून निर्माण होणारी वीज लिथियम बॅटऱ्यांमध्ये साठवली जाणार होती.

सौरउर्जेवरील विजेमुळे आश्रमशाळेचे वीज देयक कमी होईल, अशी ही व्यवस्था उभारण्यामागे शासनाची धारणा होती. वीज पुरवठा खंडित झाल्यास बॅटऱ्यांमध्ये साठविलेल्या विजेमुळे विद्यार्थ्यांच्या प्रत्येक खोलीत एक दिवा आणि पंखा फिरु शकेल, असे गणित होते. त्याचा समावेश अंदाज पत्रकात असतानाही संबंधीत ठेकेदारांनी चलाखी करुन प्रत्येक आश्रमशाळेत लिथियमऐवजी साध्या ट्युब्युलर बॅटऱ्या टाकल्या. या साध्या बॅटऱ्यांमुळे संबंधीत आश्रमशाळांना या यंत्रणेचा फारसा उपयोग होत नाही.

आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, आदिवासी विकास विभागाचे अधिकारी यांना यासंदर्भातील तांत्रीक बाबी माहिती नसल्या तरी लिथियमऐवजी साध्या बॅटरी लावल्या जात असतांना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

या संपूर्ण प्रकरणाची तपासणी करण्यात येईल. यात कोणी दोषी आढळल्यास त्यांच्याविरुध्द कारवाई करण्यात येईल. – अनय नावंदर ( तळोदा प्रकल्प प्रमुख, आदिवासी विकास विभाग)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लिथियम आणि ट्युब्युलर बॅटरी मधील फरक

लिथियम आणि ट्युब्युलर बॅटरींमध्ये मुख्य फरक त्यांच्या कार्यक्षमतेत, आयुष्यमानात आणि किमतीत आहे. लिथियम अधिक कार्यक्षम, जास्त काळ टिकणाऱ्या आणि महाग असतात. ट्युब्युलर स्वस्त आणि मध्यम प्रमाणात वीज साठवणुकीसाठी योग्य असतात. लिथियम लहान आकारात जास्त ऊर्जा साठवू शकतात. त्यांचे आयुष्य १० ते १२ वर्षे असते. ट्युब्युलरचे आयुष्य तीन ते पाच वर्षे असते. लिथियम बॅटरीला कमी देखभाल आणि कमी पाण्याची गरज असते. ट्युब्युलरला नियमितपणे पाण्याची पातळी तपासणे आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकणे आवश्यक असते. लिथियम बॅटरीसाठी विशिष्ट चार्जरची आवश्यकता असते, तर ट्युब्युलरसाठी सामान्य चार्जर वापरला जाऊ शकतो