scorecardresearch

Premium

इच्छुक उमेदवारांची ‘शाळा’

महापालिका निवडणुकीसाठी २७ जानेवारी ते ३ फेब्रुवारी ही अर्ज भरण्याची मुदत आहे.

नाशिक महापालिका सभागृहात इच्छुक उमेदवारांना मार्गदर्शन करताना पालिका आयुक्त अभिषेक कृष्णा व इतर.
नाशिक महापालिका सभागृहात इच्छुक उमेदवारांना मार्गदर्शन करताना पालिका आयुक्त अभिषेक कृष्णा व इतर.

अर्ज मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम

कुटुंबाची मालमत्ता नमूद करताना माहेरकडून मिळालेली संपत्तीही नमूद करायची का.. दोन वर्षांच्या आत शिक्षा होईल अशा गुन्ह्यांची माहिती द्यायची आहे का.. सूचक-अनुमोदकाच्या करांबाबतची माहिती द्यावी लागेल का.. संकेतस्थळावर आताच अर्ज भरला तर चालेल का.. सव्‍‌र्हरवर ताण आल्याने उद्भवणाऱ्या अडचणींवर तातडीने तोडगा काढण्याची काय व्यवस्था आहे.. अशा विविध प्रश्नांचा भडिमार महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून करण्यात आला. महापालिकेच्या वतीने ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी बुधवारी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

महापालिका निवडणुकीसाठी २७ जानेवारी ते ३ फेब्रुवारी ही अर्ज भरण्याची मुदत आहे. हा अर्ज कसा भरावा या प्रक्रियेत रुळलेल्या विद्यमान व माजी लोकप्रतिनिधींनी त्याचा फारसा ताण घेतला नाही. मात्र रिंगणात प्रथमच उतरणाऱ्या इच्छुकांची या प्रशिक्षणास चांगलीच गर्दी केली होती. यामध्ये आपला मुहूर्त कसा साधता येईल याचे गमकही निवडणूक यंत्रणेने कथन केले. नवोदितांनी सर्व शंकांचे निरसन करवून घेण्याचा प्रयत्न केला. इच्छुकांची संख्या अधिक असल्याने प्रशिक्षणाचे दोन सत्र घेणे क्रमप्राप्त ठरले.

या प्रशिक्षण वर्गासाठी बहुतांश इच्छुक वही व पेन घेऊन दाखल झाले होते. प्रत्येक माहिती ते सविस्तरपणे लिहून घेत होते. यामुळे स्थायी समिती सभागृहास शालेय वर्गाप्रमाणे स्वरूप प्राप्त झाल्याचे पाहावयास मिळाले. या प्रात्यक्षिकांवेळी ‘नेट कनेक्टिव्हिटी’ खंडीत होत असल्याने अर्ज भरताना काय होईल, याची धास्ती इच्छुकांमध्ये पसरली. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज ऑनलाइन भरणे प्रत्येक उमेदवाराला बंधनकारक आहे. या अर्जासोबत शपथपत्रे व सहपत्रे ऑनलाइन समाविष्ट करावी लागतील. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांची प्रिंट काढून अर्ज मुदतीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे द्यावा लागणार आहे. ऑनलाइन पध्दतीने अर्ज भरण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी इच्छुकांनी इतके प्रश्न उपस्थित केले की, त्यांची उत्तरे देतांना अधिकाऱ्यांची दमछाक झाली. ‘स्लाईड शो’द्वारे मार्गदर्शन करणाऱ्यांनी ‘साहेब आल्यावर सांगतील’ असे सांगत अनेक प्रश्न टोलावले. जात पडताळणी प्रमाणपत्राची माहिती कशी भरायची, शपथपत्र भरताना घ्यावयाची काळजी, वैयक्तिक माहितीत काय द्यावे लागणार, संपत्ती, दाखल गुन्हे व न्यायालयीन प्रकरणांबाबतचे प्रश्न उपस्थित केले. शासकीय करांच्या माहितीबाबत उमेदवार पालिकेचा थकबाकीदार नसणे बंधनकारक आहे. या पद्धतीत अर्ज भरताना संगणकीय प्रणालीवर ताण येऊन अडचणींना तोंड द्यावे लागते. त्या सोडविण्यासाठी काय व्यवस्था आहे, अशीही विचारणा काहींनी केली. त्यावर एक खिडकी योजनेच्या ठिकाणी त्यासाठी खास दोन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अर्ज भरण्याच्या मुदतीत ऑनलाइन अर्ज २४ तासांत कधीही भरता येईल. ज्यांना अर्ज मुहूर्तावर सादर करावयाचा आहे, त्यांनी तो उपरोक्त काळात आधी भरून ठेवावा आणि आपणास हव्या त्या मुहूर्तावर सादर करावा. अर्ज भरण्यासाठी कोणीही घाई करण्याची गरज नसल्याचे सांगण्यात आले. काही शपथपत्र नोटरी करण्याची गरज नाही. साध्या कागदावर त्यांची प्रिंट चालणार आहे. एक खिडकी योजनेत ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केल्यास ते दुसऱ्या दिवसापर्यंत देण्याची व्यवस्था केली जाईल. या संदर्भात एका इच्छुकाने प्रमाणपत्रासाठी सर्व विभागीय कार्यालयात ही व्यवस्था नसल्याचे लक्षात आणून दिले. तेव्हा आयुक्तांनी निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्तीनंतर ही प्रक्रिया केली गेल्याचे स्पष्ट केले.

रविवारीही अर्ज स्वीकारणार

महापालिकेसाठी अर्ज भरण्याची मुदत २७ जानेवारी ते ३ फेब्रुवारी आहे. या काळात रविवार येत असून त्या दिवशी उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार असल्याची माहिती पालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिली. एक खिडकी योजनेच्या ठिकाणी अर्ज सादर केल्यावर दुसऱ्याच दिवशी ना हरकत दाखला दिला जाईल. या ठिकाणी ऑनलाइन अर्ज भरण्यासंदर्भात मार्गदर्शनासाठी प्रत्येकी दोन कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nashik municipal election issues

First published on: 26-01-2017 at 00:48 IST

आजचा ई-पेपर : नाशिक

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×