तीन छाप्यांत सहा जणांना अटक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरातील वेगवेगळ्या भागांत मसाज पार्लरच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय सुरू असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. त्रिमूर्ती चौक येथील ग्लोअप स्पा, पंडित कॉलनीतील शुभांगी ब्युटीपार्लर आणि गंगापूर रस्त्यावरील प्रसाद चौकात आयुर्वेदिक मसाज सेंटर येथे हे प्रकार राजरोस सुरू असल्याचे पोलीस कारवाईत स्पष्ट झाले. या प्रकरणी सहा संशयितांविरुद्ध पिटाअंतर्गत कारवाई करण्यात आली तर या ठिकाणी सापडलेल्या १२ महिलांना वात्सल्य महिला सुधारगृहात ठेवण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षांत शहरीकरणाचा वेग जसा वाढत आहे, तसेच अवैध धंद्यांचे प्रमाणही वाढत आहे. काही दिवसांपूर्वी कॉलेज रोडसारख्या उच्चभ्रू परिसरात अनैतिक व्यवसाय सुरू असल्याचे उघड झाले होते. तेव्हापासून पोलिसांनी स्पा, ब्युटीपार्लर आणि मसाज सेंटरवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. स्पा, मसाज सेंटर व ब्युटीपार्लरच्या नावाखाली कुंटणखाणे चालविले जात असल्याच्या संशयावर पोलिसी कारवाईने शिक्कामोर्तब झाले. पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी शहर गुन्हे शाखेने एकत्रितपणे शहरातील स्पा, मसाज् सेंटर आणि ब्युटीपार्लरची झाडाझडती घेतली. त्याअंतर्गत बनावट ग्राहक पाठवून अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची खात्री करून छापे टाकण्यात आले. त्यात त्रिमूर्ती चौकातील ग्लोअप स्पा येथे संचालिका निशा जितू सोनवणे (रा. त्रिमूर्ती, अंबड), तिचा

साथीदार प्रशांत रघुनाथ पर्वते (रा. उपेंद्रनगर) यांच्यासह सूर्यभान वामन सांगळे (रा. सिन्नर) आणि सुनील निवृत्ती खैरनार (रा. चास, सिन्नर) या दोन ग्राहकांना अटक करण्यात आली.

तशीच कारवाई पंडित कॉलनीतील शुभांगी ब्युटीपार्लरवर करण्यात आली. ब्युटीपार्लरची संचालिका प्रीती ऊर्फ जया अनिल कुमावत तर गंगापूर रस्त्यावरील प्रसाद सर्कल परिसरातील आयुर्वेदिक मसाज सेंटरवरही छापा टाकून चालक मनीषा शरद पवार आणि ग्राहक गोपीचंद सुरेश गायकवाड यांना अटक करण्यात आली. या कारवाईत एकूण १५ महिलांना ताब्यात घेण्यात आले. सहा संशयितांवर पिटाअंतर्गत कारवाई करण्यात आली, तर १२ पीडित महिलांना वात्सल्य सुधारगृहात ठेवण्यात आले. या प्रकरणी अंबड, सरकारवाडा व गंगापूर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त दत्तात्रय कराळे, साहाय्यक आयुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट १ चे सुभाषचंद्र देशमुख, युनिट ३ चे नारायण न्याहाळदे आदींच्या पथकाने केली.

सराईत गुन्हेगाराकडून देशी कट्टा जप्त

महात्मानगर बस थांबा परिसरात संशयिताकडून पोलिसांनी देशी बनावटीचा कट्टा हस्तगत केला. महात्मानगर परिसरात दोन व्यक्ती देशी कट्टा विक्री करण्याच्या उद्देशाने येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने सापळा रचला. त्या अंतर्गत प्रथम अक्षय सोनू कोठेकर (बिडी कामगारनगर, आडगाव) याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्याने ज्याच्याकडून देशी बनावटीचा कट्टा खरेदी केला, त्या मोहन वसंत गवळी (गणेशवाडी) या संशयितालाही पकडण्यात आले. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परवाने रद्द करण्याचा प्रयत्न

मागील काही वर्षांत शहरात ब्युटीपार्लर, स्पा आणि मसाज सेंटरच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय सुरू असल्याचे समोर आले आहे. याविरोधात पोलिसांनी कठोर मोहीम हाती घेतली आहे. कारवाई करण्यात आलेल्या सेंटरचे परवाने रद्द करण्यासाठी कायदेशीर कारवाई केली जात आहे. याबाबत शॉप अ‍ॅक्ट परवाना कार्यालयाशी संपर्क साधण्यात येईल.

– दत्तात्रय कराळे (उपायुक्त, गुन्हे शाखा)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik police raid massage parlour
First published on: 28-10-2016 at 03:31 IST