अनिकेत साठे, लोकसत्ता

नाशिक : १४ एकरचे विस्तीर्ण क्षेत्र, चारही बाजूने किल्ल्याप्रमाणे तटबंदी, अंतर्गत भागासह आसपासच्या परिसरावर सीसीटीव्ही आणि आधुनिक उपकरणांनी टेहळणी, प्रवेशद्वारावर ये-जा करणाऱ्याची कसून अंग झडती, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची (सीआयएसएफ) कडेकोट सुरक्षा, अशी सर्व व्यवस्था असतानाही नाशिक रोड येथील चलार्थपत्र मुद्रणालयात पाच लाख रुपयांच्या नोटांना पाय फुटले. खरे तर पाच महिन्यांपूर्वीची ही घटना. हिशेब लागत नसलेल्या नोटांचा मुद्रणालय नियुक्त समितीने शोध घेण्याचा प्रयत्नही केला. पण, चौकशीत काही सापडले नाही. अखेरीस हे प्रकरण पोलिसांकडे सुपूर्द करावे लागले आणि देशाच्या चलन छपाईची भिस्त सांभाळणाऱ्या चलार्थपत्र मुद्रणालयातील व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले.

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
chandrachud (1)
“लैंगिक भेदभाव संपवा, स्त्रियाही खोल समुद्रात जाऊ शकतात”, कोस्ट गार्डप्रकरणी सुप्रिम कोर्टाने केंद्राला फटकारले
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास

अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारीतील चलार्थपत्र आणि भारत प्रतिभूती ही दोन्ही मुद्रणालये नाशिकरोड भागात आहेत. बनावट मुद्रांक घोटाळ्यावेळी भारत प्रतिभूती मुद्रणालय प्रकाशझोतात आले होते. तिथे मुद्रांक, टपाल तिकिटे, पारपत्र आदींची छपाई होते, तर चलार्थपत्र मुद्रणालयात नोटांची. रिझव्‍‌र्ह बँकेच्या मागणीनुसार १०, २०, ५०, १०० आणि ५०० रुपयांच्या नोटा छापल्या जातात. या मुद्रणालयात सुमारे १२०० कामगार काम करतात. दररोज सरासरी १८ ते १९ दशलक्ष नोटा छापल्या जातात. कडेकोट बंदोबस्तात त्या रेल्वेमधून रिझव्‍‌र्ह बँकेच्या देशातील वितरण केंद्रात पाठविल्या जातात. नोटा गहाळ होण्याचा प्रकार करोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर म्हणजे फेब्रुवारी २०२१ मध्ये घडला. मुद्रणालयात केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतील सीआयएसफची सुरक्षा व्यवस्था आहे. उपरोक्त घटना लक्षात आल्यावर प्रारंभी दोन अधिकाऱ्यांची अंतर्गत समिती नेमून चौकशी केली गेली. त्यातून काहीच उघड न झाल्याने अखेरीस पोलिसात तक्रार देण्यात आली.

काही जण मुद्रणालयातून कागदाचा लहानसा तुकडाही आत-बाहेर करता येत नाही, तिथून ५०० रुपये मूल्य असलेले १० नोटांचे बंडल कसे बाहेर जातील, असाही प्रश्न करतात. छपाईवेळी शाई किं वा अन्य कारणांनी काही कागदांवर योग्य छपाई होत नाही. खराब नोटा बाजूला काढल्या जातात. अशा आणि निकषानुसार परिपूर्ण अर्थात चांगल्या नोटांचे वर्गीकरण केले जाते. बंडल वेष्टित करताना कधीकधी काही बंडल इकडे तिकडे होतात.

अनेकदा ते नंतर सापडतातही. पण पाच लाख रुपये मूल्यांचे हे बंडल काही सापडले नाही. मुद्रणालयातील कामगारांवर कामाचा प्रचंड ताण आहे. काही वर्षांपूर्वी दोन हजारहून अधिक कामगार होते. दरवर्षी निवृत्त होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. करोनामुळे काही जणांना प्राण गमवावे लागले. कामगारांची संख्या कमी होऊन सध्या १२०० वर आली आहे. तथापि, नोटा छपाईचे वार्षिक लक्ष्य वाढतच आहे. या ताणातून काही मानवी चुका घडल्या का, हे तपासात उघड होऊ शकते.

घोटाळ्यानंतर आलेले शहाणपण

तेलगीच्या बनावट मुद्रांक घोटाळ्याने भारत प्रतिभूती मुद्रणालयातील सुरक्षा व्यवस्थेतील उणिवा समोर आल्या होत्या. मुद्रणालयातील जुने छपाई यंत्र तेलगीने मिळवले होते. त्यामुळे त्याला बनावट मुद्रांकांची छपाई करणे शक्य झाल्याचे मुद्रांक घोटाळ्याच्या चौकशीत उघड झाले होते. त्या प्रकरणात मुद्रणालयातील तत्कालीन अधिकाऱ्यांची चौकशी होऊन कारवाई झाली होती. त्यावेळी निवृत्त लष्करी संघटनेकडे असलेली सुरक्षेची जबाबदारी काढून घेतली गेली. प्रतिभूती आणि चलार्थपत्र या दोन्ही मुद्रणालयांची धुरा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे सोपविण्यात आली. मुद्रणालयातून भंगारात आणि अन्य कोणत्याही मार्गाने महत्त्वाचे साहित्य बाहेर जाणार नाही, याकरिता तजवीज करण्यात आली. छपाई प्रक्रियेत शिल्लक राहिलेल्या टाकाऊ सामग्रीची मुद्रणालयातच विल्हेवाट लावण्याची व्यवस्था आहे. टेहळणीसाठी अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित आहे. मुद्रणालय परिसरासह अंतर्गत भाग ‘सीसीटीव्ही’च्या देखरेखीखाली असतो. मुद्रणालयात प्रवेश करताना आणि बाहेर पडताना प्रत्येकाची अंगझडती घेतली जाते. अशा परिस्थितीत पाच लाख रुपयांच्या नोटा गेल्या कुठे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.