पारा ८.२ अंशांवर

आठवडाभरापासून गारव्याची अनुभूती घेणाऱ्या नाशिकमध्ये थंडीची लाट आली आहे. आता बुधवारी ८.२ या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. काही दिवसांपूर्वी धुक्यांच्या दुलईत हरविलेल्या नाशिकमध्ये ऐन नाताळात गारठून टाकणाऱ्या थंडीने सर्वसामान्यांना चांगलीच हुडहुडी भरली आहे. गजबजणाऱ्या बाजारपेठेतही लवकर सामसूम होत असल्याचे चित्र आहे.

यंदा हंगामाच्या अखेपर्यंत पावसाने हजेरी लावल्याने थंडी कशी असणार, याबाबत सर्वसामान्यांनी काही अंदाज बांधले होते. थंडीच्या तीव्रतेविषयी मतमतांतरे व्यक्त झाली होती. दिवाळीनंतर जिल्ह्य़ात गारवा जाणवण्यास सुरुवात झाली होती. तापमानाची पातळी कमी होत असताना ओखी वादळाने व्यत्यय आणला. अवकाळी पावसामुळे कमी होणाऱ्या तापमानाला ब्रेक लागला. त्यावेळी १७ अंशावर गेलेले तापमान मागील आठवडय़ात कमी होऊ लागले.  ते आठ अंशांनी कमी झाले. २० डिसेंबर रोजी ९.२ अंश तापमानाची नोंद झाल्यानंतर बुधवारी पारा ८.२ अंशावर आला. या बाबतची माहिती हवामानशास्त्र विभागाने दिली.

उत्तरेकडून वाहत येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव नाशिकसह उत्तर महाराष्ट्राच्या तापमानावर पडतो. सध्या उत्तर भारतात बर्फवृष्टी, थंडीची लाट आली आहे. त्या भागातून वाहत येणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव नाशिकच्या वातावरणावर पडला. थंडीच्या लाटेने सगळे वातावरण जणू गोठवून टाकले आहे गारव्यामुळे दैनंदिन जनजीवन परिणाम झाला आहे. काही पालकांनी पाल्यांना शाळेत पाठविले नाही. सकाळी आणि सायंकाळी गारवा अधिक असल्याने अनेक नागरिक या वेळेत घराबाहेर पडणे टाळत आहेत.

एरवी नऊ ते दहा वाजेपर्यंत गजबजणाऱ्या बाजारपेठेत रात्री आठनंतर ग्राहकांची वर्दळ कमी झाल्याचे दिसते.

मागील काही वर्षांतील नोंदी पाहता डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये तापमान नीचांकी पातळी गाठते असा अनुभव आहे. मागील वर्षी २३ डिसेंबर रोजी तापमानाने ८.३ अंशाची पातळी गाठली होती. नाशिकचा पारा कधी कधी पाच ते सहा अंशापर्यंत खाली गेल्याची उदाहरणे आहेत. नववर्षांच्या स्वागतावेळी थंडीची लाट आल्याने वातावरणात वेगळाच उत्साह संचारला आहे.

द्राक्ष उत्पादक चिंतेत

थंडीची लाट आल्याने द्राक्ष उत्पादक धास्तावले आहेत. तापमान घसरल्यावर द्राक्ष वेलींच्या प्रगतीवर परिणाम होतो. मण्यांचा आकार वाढत नाही. अखेरीस वजनात घट होऊ शकते. अवकाळी पावसाच्या नुकसानीनंतर जिल्ह्य़ातील उर्वरित द्राक्ष बागा चांगल्या विकसित झाल्या. तापमान कमी झाल्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्य मिळू शकत नाही. द्राक्षवेलीला त्याची कमतरता भासते. यामुळे शेतकऱ्यांना बाहेरून सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी करावी लागणार असल्याचे द्राक्ष बागायतदार संघाचे विभागीय अध्यक्ष माणिकराव पाटील यांनी सांगितले. या वातावरणामुळे अनेक बागांमध्ये फवारणीचे काम सुरू झाले आहे. या स्थितीत द्राक्ष बागेत ओलावा ठेवण्याची गरज आहे. शक्य झाल्यास बागांच्या आजूबाजूला शेटनेट लावले तर बाहेरील आणि आतील तापमानात एक-दोन अंशाचा फरक पडू शकतो, असे पाटील यांनी सांगितले. हंगामात द्राक्षबागांना काही नैसर्गिक संकटांना तोंड द्यावे लागले. यामुळे द्राक्ष निर्यातीवर परिणाम होणार नसला तरी स्थानिक बाजारात काही परिणाम होऊ शकतो असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.