अघोषित भारनियमनाचे चटके

हंगामातील उष्णतेचा उच्चांक गाठल्यानंतर आठवडाभरात तापमानाच्या शृंखलेत काहीसे चढ-उतार होत असले तरी टळटळीत उन्हामुळे जनजीवनावर विपरीत परिणाम झाला आहे. या स्थितीत शहरात सातत्याने अघोषित भारनियमनाचे चटके बसत आहे. यामुळे वाढत्या उकाडय़ाला तोंड देताना सर्वाच्या नाकीनऊ आले आहे.

थंड हवेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या नाशिकमध्ये मे महिन्यात उन्हाची दाहकता अधिकच वाढली आहे. एप्रिल महिन्यात ४० अंशांच्या आसपास राहिलेल्या तापमानाने मेच्या दुसऱ्या आठवडय़ात ४१ अंशांचा टप्पा ओलांडला आहे. पुढील काळात तो अधिक उंचावण्याची धास्ती होती, मात्र तसे घडले नाही. १० मे रोजी ४१.१ वर चढलेला पारा सात दिवसांत काहीसा कमी होऊन ३७ ते ३९ अंशांच्या दरम्यान रेंगाळत आहे. परंतु तीव्र उष्णता, उकाडा कायम राहिल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

सकाळी आठ-नऊ वाजल्यापासून उन्हाचे चटके बसतात. उन्हाच्या तडाख्याने बहुतांश नागरिक दुपारी घराबाहेर जाणे टाळतात. यामुळे या काळात प्रमुख बाजारपेठा, रस्त्यांवर वर्दळ कमी झाल्याचे दिसून येते. प्रमुख बाजारपेठांमधील व्यवहार थंडावतात. शासकीय कार्यालयांतील कामकाजात संथपणा येतो. ऊन उतरल्यानंतर सायंकाळी नागरिक घराबाहेर पडतात. बाजारपेठेतही गर्दी होते. सर्वसाधारणपणे मेच्या उत्तरार्धात ढगाळ वातवरण होऊन तापमान कमी होण्यास सुरुवात होते. तशी चिन्हे अद्याप दिसत नाही.

अलीकडेच मनमाडसह आसपासच्या काही भागात तुरळक पावसाचा शिडकावा झाला होता. त्यामुळे उष्मा अधिकच वाढला. मनमाडचा पारा यंदा ४३ अंशांपर्यंत पोहोचल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सूर्याचा प्रकोप कायम राहतो. ग्रामीण भागात गर्दीच्या ठिकाणी सामसूम दिसून येते. रस्त्यांवर शुकशुकाट होत असून राज्यमार्गावरील वाहतुकीवरही तापमानाचा मोठा परिणाम झाला आहे. दुपारी वाहनांची अत्यंत तुरळक वर्दळ राज्यमार्गावर दिसून येते. उकाडय़ाने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाचे आगमन कधी होईल याची प्रतीक्षा आहे.

दरम्यान, रमजान पर्वादरम्यान भारनियमन होणार नसल्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नमूद केले आहे. राज्यात विजेची कमतरता नाही. त्यामुळे भारनियमन करू नये असे निर्देश देण्यात आले आहे. तांत्रिक कारणामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास ते भारनियमन समजू नये, असे त्यांनी सांगितले आहे.

महावितरणकडून छुप्या मार्गाने भारनियमन?

कोणत्याही भागात कोणत्याही वेळी वीजपुरवठा खंडित केला जातो. मध्यवर्ती बाजारपेठ असणाऱ्या महात्मा गांधी रोड, रविवार कारंजा, शालिमार, भद्रकाली परिसरात मध्यंतरी सायंकाळी खंडित होणारा वीजपुरवठा गुरुवारी सकाळीच अकस्मात खंडित झाला. शहरातील अन्य भागातही हा प्रकार घडत आहे. या घटनाक्रमाने महावितरणने छुप्या मार्गाने भारनियमन करीत असल्याची साशंकता व्यक्त होत आहे.  सायंकाळी गर्दीच्या वेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने व्यापारीवर्गात संताप आहे. या संदर्भात विचारणा केल्यावर महावितरण स्थानिक बिघाडाचे कारण पुढे करते. तांत्रिक समस्या उद्भवल्याने काही भागांत वीजपुरवठा खंडित होतो. शहरात कुठेही भारनियमन केले जात नसल्याचा दावा केला जातो. एखाद्या भागात अर्धा तास वीज गेली असल्यास ‘फ्यूज’ उडणे वा तत्सम बिघाड असू शकतो असे सांगितले जाते. शहरात वीजपुरवठा खंडित होण्यामागे तांत्रिक समस्या हेच मुख्य कारण असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. ग्रामीण भागात गळती-उत्पन्नाच्या निकषावर काही भागांत भारनियमन सुरू आहे. त्या आधारे कुठे चार तास तर कुठे दहा तास भारनियमन केले जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.