खासदार गोडसे यांनी प्रशासनाला खडसाविले

नाशिक : स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत चार वर्षांपासून विविध कामे सुरु असून अजूनही यातील अनेक कामे अपूर्ण आहेत. कामे अपूर्ण असल्याबद्दल खासदार हेमंत गोडसे यांनी प्रशासनाला खडसावून जाब विचारला. शासनाने दिलेल्या वाढीव मुदतीच्या आत प्रकल्पांची कामे पूर्ण झालीच पाहिजे, अशी सूचना त्यांनी प्रशासनाला केली.

स्मार्ट सिटी योजनेतंर्गत शहरात सुरूअसलेल्या विकास कामांविषयी माहिती घेण्यासाठी सोमवारी एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत गोडसे यांनी प्रशासनाकडून कामांचा आढावा घेतला. स्मार्ट सिटी योजनेतंर्गत शहरातील ५४ विविध प्रकल्पांची कामे अतिशय संथपणे सुरू असल्याची तक्रार शहरातील विविध संस्था, नागरिकांकडून खासदार गोडसे यांच्याकडे करण्यात आली होती. या तक्रारींची दखल घेऊन गोडसे यांनी स्मार्ट सिटी योजनेच्या अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेतली. स्मार्ट सिटी योजनेचे कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांच्यासह इतर अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते

या बैठकीत गोडसे यांनी रखडलेल्या कामांबाबत प्रशासनाला जाब विचारला. तेव्हा करोनामुळे दीड वर्षे प्रकल्पांची कामे ठप्प झाली होती, असे स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आले. गोडसे यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत शहरांमध्ये सुरू असलेल्या ५४ प्रकल्पांच्या कामाच्या प्रगतीविषयीची माहिती स्मार्ट सिटी प्रशासनाकडून घेतली. स्मार्ट सिटीसाठी शासनाकडून सुमारे एक हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. शहरात ५४ प्रकल्पांची कामे सुरू असून या कामांचा चार गटांत समावेश करण्यात आला आहे.

स्मार्ट सिटी अंतर्गत १९ कामांपैकी सात कामे पूर्ण झाली असून आठ कामे सुरू तर पाच कामे सुरु होण्याच्या मार्गावर आहेत. सार्वजनिक आणि खासगी भागीदारी अंतर्गत नऊ कामांचा समावेश असून पैकी दोन कामे पूर्ण तर,चार कामे प्रगतीपथावर आहेत. तीन कामे सुरु होण्याच्या स्थितीत आहेत. सामाजिक दायित्व गटात पाच कामांचा समावेश असून चार कामे पूर्ण तर, एक काम सुरु होण्याच्या स्थितीत  असल्याची माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी दिली.

देशभरात नाशिक शहराची ओळख ‘रामभूमी’ अशी असल्याने राम-लक्ष्मण-सिता यांची भव्य प्रतिकृती रामकुंड परिसरात असणे अत्यंत आवश्यक असल्याचे गोडसे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.