नाशिक : उन्हाचा तडाखा वाढल्याने शहरात वेगवेगळ्या ठिकाणी नऊ जणांचा चक्कर आल्यामुळे मृत्यू झाला असल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. नागरिकांनी मळमळ होणे, चक्कर येणे, उलटी होणे, अशा लक्षणांकडे सध्याच्या परिस्थितीत दुर्लक्ष करू नये, असा सल्ला वैद्यकीय वर्तुळातून देण्यात आला आहे.

जिल्ह्य़ात करोनाप्रमाणेच उन्हाचा तडाखाही वाढत आहे. शहरात दोन ते तीन दिवसात १३ जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी नऊ जणांचा चक्कर आल्याने मृत्यू झाल्याची नोंद आहे. या घटना इंदिरानगर, उपनगर, श्रमिकनगर, नाशिकरोड, देवळाली, सिडको येथे घडल्या आहेत. यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी चक्कर नेमकी कशामुळे आली याचा अभ्यास करणे गरजेचे असून नागरिकांनी उन्हात बाहेर कामासाठी जाताना काळजी घ्यावी, असे आवाहन के ले. चक्करचे प्रमाण अचानक वाढले असल्यास याची माहिती घ्यावी लागेल. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्ला डॉक्टरांनी दिला.

पोलीस आयुक्त-जिल्हा शल्यचिकित्सकांची आज बैठक

शहरात २४ तासांत नऊ जणांचा चक्कर आल्यामुळे मृत्यू झाला. वेगवेगळ्या कारणांनी दिवसाला पाच ते आठ जणांचा मृत्यू होत आहे. त्यांच्यात श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत कळ येणे, धाप लागणे अशी लक्षणे आढळली आहेत. मुखपट्टीचा वापर करण्यात येत असल्याने श्वास घेण्यास त्रास झाला असावा, असे म्हणत याकडे दुर्लक्ष के ले जाते. हायपोथॅनिया नावाचा हा आजार असून यामध्ये हा त्रास होतो. करोना चाचणीवेळी ही लक्षणे आढळत नाही, परंतु अचानक व्यक्तीचा मृत्यू होतो. या पार्श्वभूमीवर शनिवारी पोलीस आयुक्त आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांची एकत्रित बैठक होणार आहे.