scorecardresearch

भुसावळच्या रस्त्यांवर चार्ली चॅप्लीन ;शहरवासियांना वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती

भुसावळ शहरातील विविध रस्त्यांवर चक्क चार्ली चॅप्लीन उतरल्याचे पाहून सर्वांना आश्‍चर्याचा धक्काच बसला.

Charlie Chaplin made the city dwellers aware about traffic rules in bhusawal
भुसावळच्या रस्त्यांवर चार्ली चॅप्लीन ;शहरवासियांना वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती

जळगाव – भुसावळ शहरातील विविध रस्त्यांवर चक्क चार्ली चॅप्लीन उतरल्याचे पाहून सर्वांना आश्‍चर्याचा धक्काच बसला. ज्युनिअर चार्ली म्हणून ख्यात असणारे अभिनेते सुमित पंडित यांनी पोलिसांच्या मदतीने केलेली अनोखी जनजागृती ही लक्षवेधी ठरली.सुरक्षितता पाळा अपघात टाळा असा संदेश देत भुसावळ शहर पोलिसांच्या वतीने भुसावळ येथील गांधी चौकासह विविध ठिकाणी जनजागृती करण्यात आली. ज्युनिअर चार्ली फाउंडेशन व सुलक्ष्मी बहुद्देशीय सेवाभावी संस्था यांच्यातर्फे महाराष्ट्रभर जनजागृती मोहीम राबविली जात आहे. त्याअंतर्गत भुसावळ शहरात वाहतुकीच्या नियमांबाबत जनाजागृती मोहीम राबविण्यात आली. भुसावळकरांना अपघात टाळण्यासाठी फलक, हेल्मेटविषयी जनजागृती करण्यात आली. ज्या वाहनधारकांनी हेल्मेट घातले होते, त्यांचा पुष्पगुच्छ देऊन पोलिसांच्या वतीने सन्मान करण्यात आला. ज्या वाहनधारकांनी हेल्मेट घातले नव्हते, त्यांचे ज्युनिअर चार्ली यांनी मुके घेतले, तसेच रिफ्लेक्टर, रेडियम लावण्यात आले.

हेही वाचा >>>कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणुकीबाबत वंचित आघाडीची भूमिका काय? प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, “आम्ही…”

याप्रसंगी वरिष्ठ उपविभागीय पोलीस अधीकारी सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले की, रस्ते वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. हेल्मेट घालूनच दुचाकी चालवायची, मोटार चालविताना सर्वप्रथम सीटबेल्ट लावायचा. ट्रॅक्टरमध्ये टेपरेकॉर्डर, ध्वनिक्षेपक यंत्रणा ठेवू नये. गाण्याच्या आवाजाने मागील वाहनांच्या भोंग्याचा आवाज येत नाही. त्यामुळे चालकांनी वाहन चालवताना दक्षता घ्यावी. जर वाहनात टेपरेकॉर्डर आढळला, तर गुन्हा दाखल करण्यात येईल. गेल्या वर्षभरात आतापर्यंत मोठ्या प्रमाणात रस्ते अपघातात अंदाजे बरेच जणचे जीव गेले आहेत. त्यामुळे वाहन चालवताना काळजी घ्यावी. आपला जीव मौल्यवान आहे. आपल्यामागे कुटुंब आपली वाट पाहत आहे. आपण सुरक्षित तर आपले कुटुंब सुरक्षित, असा संदेश दिला.

हेही वाचा >>>“…म्हणून सत्यजीत तांबे महाविकास आघाडीत जाणार नाहीत”; चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास

पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक, चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पडघन, विलास शेंडे, वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक स्वप्निल नाईक, समाजसेवक सुमित पंडित, समाजसेविका पूजा पंडित, माणुसकी समूहाचे पथकांसह कर्मचाऱ्यांनी मदतकार्य केले. ज्युनिअर चार्ली समाजसेवक सुमित पंडित यांनी नागरिकांना रस्ते वाहतुकीची परिपूर्ण माहिती दिली.

समाजसेवक सुमित पंडित यांनी वाहतुकीचे नियम आपल्या मूक अभिनयातून ज्युनिअर चार्लीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. ज्युनिअर चार्ली तथा समाजसेवक सुमित पंडित यांनी आपल्या हास्यकलेतून लोकांना वाहतुकीचे संपूर्ण नियम समजून सांगण्यासाठी आपल्या मूक अभिनयातून जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांना त्यांची मदत होत आहे.-सोमनाथ वाघचौरे (उपविभागीय पोलीस अधिकारी)

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 16:27 IST
ताज्या बातम्या