घराबाहेर न पडता रुग्णांना उपचाराची माहिती मिळण्याचा पर्याय

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक : सध्या करोना महामारीत रुग्णांनी घराबाहेर पडणे धोक्याचे असल्याने यावर पर्याय म्हणून महापालिके च्या वतीने लवकरच स्वतंत्र टेलिमेडिसिन विभाग कार्यरत करण्यात येणार आहे. डॉक्टरांनी रुग्णांना प्रत्यक्ष तपासणे महत्त्वाचे असले तरी सध्याची आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता बाहेर पडून संसर्गाचा धोका पत्करण्यापेक्षा हा तात्पुरता पर्याय योग्य असल्याची माहिती महापालिके चे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.

करोनाचा संसर्ग वेगाने फैलावत असताना इतर आजाराने त्रस्त रुग्णांकडे सध्या सर्वाचेच दुर्लक्ष होत आहे. दवाखान्यात रुग्णांनी येण्याचा धोका स्वीकारण्यापेक्षा खासगी डॉक्टरांकडून त्यांना टेलिमेडिसिनचा पर्याय दिला जात आहे. या पद्धतीत भ्रमणध्वनीद्वारे  रुग्णांना कोणते उपचार आवश्यक आहेत, त्याची माहिती दिली जात असल्याने सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत ही पद्धत उपयुक्त ठरत असल्याचा दावा आरोग्य विभागाकडून के ला जात आहे. जिल्हा परिसरात करोना रुग्णांची संख्या तीन लाख ३३,७५७ च्या घरात पोहोचली आहे. या काळात करोनाव्यतिरिक्त अन्य आजारांनीही डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्ह्य़ातील बहुतांश रुग्णालये ही करोना उपचार केंद्र, करोना रुग्णालयांमध्ये परावर्तित झाली आहेत. त्यामुळे जी अन्य रुग्णालये, दवाखाने सुरू आहेत ते करोनाव्यतिरिक्त अन्य रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यास तयार नाहीत. बहुतांश खासगी रुग्णांलयाकडून कर्मचारी विलगीकरणात असल्याचे तसेच खाटा उपलब्ध नसल्याचे कारण दिले जाते. आईला धाप लागत होती. करोनासदृश लक्षणे असल्याने त्यांच्यावर त्याच औषधांचा मारा झाला. करोना चाचणीचा अहवाल नकारात्मक आल्याने लसीकरण करण्यात आले. सध्या आईला तोंड येणे, अशक्तपणा असा त्रास जाणवत आहे.

खासगी डॉक्टर भ्रमणध्वनीवरून प्राणवायूची पातळी, शरीराचे तापमान विचारतात. काही चाचण्याही सांगतात. परंतु, प्रत्यक्ष तपासण्यास नकार देत आहेत. वास्तविक आईला डॉक्टरांनी प्रत्यक्ष तपासण्याची गरज असताना त्यांच्याकडून भ्रमणध्वनीच्या माध्यमातून सूचना करण्यात येत आहेत. सरकारी रुग्णालयांमध्ये करोनाग्रस्त रुग्ण असल्याने तेथे आईला नेणे धोकादायक ठरेल, अशा विचित्र स्थितीत अडकल्याचे कीर्ती क्षीरसागर यांनी सांगितले.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ. हेमंत सोननीस यांनी यासंदर्भात टेलिमेडिसिन हा सरकारकडून  सुचविण्यात आलेला पर्याय असल्याचे सांगितले. याचा वापर कधी, कुठे करायचा याचे निकष ठरलेले आहेत. या पद्धतीचा वापर केल्याने रुग्णालयांवरील ताण कमी होत असून कमीतकमी लोक घराबाहेर पडत आहेत. फक्त याचा वापर कसा करावा, हे रुग्णांच्या शारीरिक क्षमतेवर अवलंबून आहे. ही पद्धत करोना काळात उपयुक्त असल्याचा दावा त्यांनी केला.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनीही राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून ‘ई- संजीवनी’ उपक्रम सुरू असून तो  उपयुक्त असल्याचे सांगितले. याचा फायदा ग्रामीण भागात आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी घेत आहेत. करोना नसलेल्या रुग्णांचे प्रश्न थेट तज्ज्ञ मंडळीकडे मांडून त्यावर उपचार पद्धती समजावून घेतली जात आहे. गरज पडल्यास रुग्णांना बोलावण्यात येत असल्याचेही त्यांनी नमदू केले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Option provide treatment information patients without leaving home ssh
First published on: 05-05-2021 at 01:21 IST