सावरकर समर्थनार्थ भाजपच्या, तर भाजप विरोधात काँग्रेसची घोषणाबाजी

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीच्या वादग्रस्त विधानावरून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचा निषेध आणि सुधारित नागरिकत्व कायदा केल्याबद्दल पंतप्रधान, गृहमंत्र्यांचे अभिनंदन या दोन प्रस्तावावरून महापालिकेच्या सभेत सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेस- राष्ट्रवादीच्या सदस्यांमध्ये घोषणायुद्ध झाले.

भाजप नगरसेवकांनी राहुल गांधी यांचा निषेध केला. तर काँग्रेस, राष्ट्रवादीने त्याच आवाजात प्रत्युत्तर दिले. नागरिकत्व दुरुस्तीचा विरोधकांनी निषेध केला. या घटनाक्रमात सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली असतांना सेनेचे नगरसेवक तटस्थ राहिले. उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रिपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. त्या वेळी भाजप नगरसेवकांनी तटस्थेची भूमिका घेतली.  शुक्रवारी सकाळी महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेली सभा अभिनंदन आणि निषेधाच्या ठरावांनी गाजली. प्रारंभी श्रद्धांजली प्रस्तावांचे वाचन झाल्यानंतर दोन मिनिटे मौन बाळगून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अभिनंदन आणि निषेधाचे प्रस्ताव वाचन सुरू झाल्यानंतर सभागृहाचे वातावरण बदलले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या निषेधाचा प्रस्ताव मांडला. त्याचे वाचन सुरू होताच भाजप सदस्य महापौरांसमोरील मोकळ्या जागेत जमा झाले. त्यांनी ‘राष्ट्रभक्तीचे एकच नांव, सावरकर.सावरकर..’ आणि राहुल गांधींविरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. तेव्हा काँग्रेस, राष्ट्रवादीचे सदस्य भाजपविरोधात घोषणा देऊ लागले. सभागृहात भाजप सदस्यांची संख्या ६५, तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे संख्याबळ १२ आहे.  भाजपसमोर त्यांचा आवाज क्षीण ठरला. महापौरांनी हस्तक्षेप करूनही कोणी ऐकण्यास तयार नव्हते. विरोधकांच्या बाकांसमोर जाऊन घोषणाबाजी करण्यात आली. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या गटनेत्यांनी मागे न हटता त्यास प्रत्युत्तर दिले. या गदारोळामुळे महापौरांनी २० मिनिटांसाठी सभा तहकूब केली. त्यानंतरही बराच वेळ सभागृहात हा गोंधळ सुरू होता. तत्पुर्वी सुधारित नागरिकत्व  कायदा केल्याबद्दल भाजपने मांडलेल्या प्रस्तावाचा राष्ट्रवादीसह समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी निषेध केला.

नव्या मित्रांपासून सेनेचे अंतर

महापालिकेत शिवसेनेचे एकूण ३५ नगरसेवक आहेत. भाजप आणि काँग्रेस, राष्ट्रवादीत घोषणायुद्ध रंगले असताना सेना बघ्याच्या भूमिकेत राहिली. भाजपचे नगरसेवक विरोधकांना लक्ष्य करत असताना प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या सेनेचे सर्व नगरसेवक सभागृहात शेवटच्या दोन-तीन रांगांमध्ये बसलेले होते. राज्यातील महा विकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मदतीला कोणीच धावून गेले नाही. नव्या मित्रांपासून सेनेने अंतर राखल्याचे पाहायला मिळाले.

उद्धव ठाकरेंच्या अभिनंदन प्रस्तावावेळी भाजपचे मौन

सेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे, मंत्रिपदी एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, सुभाष देसाई, नितीन राऊत आदींची नियुक्ती झाल्याबद्दल मांडलेल्या प्रस्तावावेळी विरोधी सदस्यांनी एकत्रितपणे बाके वाजवत अभिनंदन केले. भाजपचे नगरसेवक शांतपणे बसून होते. महापौर मौन बाळगून होते. तेव्हा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन करा, असा टोला लगावला. महापौरांनी रुसलेला भाऊ लवकरच घरी येईल, काँग्रेस-राष्ट्रवादीने काळजी करू नये, असे सांगत सर्वाचे अभिनंदन करून या विषयावर पडदा टाकला.