scorecardresearch

विनाहेल्मेटस्वारांना आजपासून दंड

अपघातात होणारे मृत्यू रोखण्यासाठी शहर पोलिसांनी हेल्मेट परिधान करणे बंधनकारक केले आहे.

५०० रुपये दंडात्मक कारवाईचा निर्णय; मवाळनंतर आता पोलिसांची कठोर भूमिका

नाशिक : संस्थेच्या आवारात विनाहेल्मेट प्रवेश दिल्यावरून महाविद्यालयांसह अन्य संस्थांचे मालमत्ता अधिकारी आणि प्राचार्यावर कारवाईचा बडगा उगारणारी पोलीस यंत्रणा रस्त्यांवरून हेल्मेटविना भ्रमंती करणाऱ्यांवर कारवाईस बगल देत असल्याकडे नाशिक वृत्तान्तमधून प्रकाशझोत टाकण्यात आल्यावर शहर पोलिसांनी आता हेल्मेट परिधान न करणाऱ्या वाहनधारकांवर मंगळवारपासून ५०० रुपये दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नियम धाब्यावर बसविणाऱ्या वाहनधारकांना समुपदेशन, परीक्षेबरोबर आर्थिक भारही सहन करावा लागणार आहे. अपघातात होणारे मृत्यू रोखण्यासाठी शहर पोलिसांनी हेल्मेट परिधान करणे बंधनकारक केले आहे. त्याअंतर्गत प्रारंभी हेल्मेटशिवाय वाहनात इंधन देण्यास बंदी घालण्यात आली. त्याचा प्रभाव दिसत नसल्याने मग शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, लष्करी आणि औद्योगिक क्षेत्र अशा सर्वच ठिकाणी हेल्मेटविना येणाऱ्या दुचाकीस्वारांना प्रवेशास प्रतिबंध करण्याचे आदेश निघाले. कार्यालयांच्या आवारात विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना प्रवेश दिल्यास संबंधित मालमत्ताधारकास जबाबदार धरण्याचे पोलिसांनी जाहीर केले. त्याअंतर्गत वाहतूक शाखेच्या भरारी पथकांनी पंचवटीतील दंत महाविद्यालयाचे मालमत्ता अधिकारी आणि कॉलेज रोडवरील हं.प्रा.ठा. महाविद्यालयाच्या प्राचार्यावर कारवाई केली होती.

या कारवाईवर शैक्षणिक वर्तुळातून प्रश्न उपस्थित झाले. त्यातही जिल्हाधिकारी कार्यालय, काही पोलीस ठाणी, अन्य शासकीय कार्यालयात हेल्मेटविना दुचाकीस्वार ये-जा करतात. अशा ठिकाणी कारवाईला बगल दिली जाते. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर रस्त्यांवर कारवाई केली जात नाही. परंतु, हे दुचाकीस्वार एखाद्या संस्थेच्या आवारात गेल्यास त्यांच्याऐवजी मालमत्ता अधिकारी, प्राचार्याना जबाबदार धरण्याची कृती योग्य नसल्याची भावना शैक्षणिक वर्तुळात उमटत आहे. विनाहेल्मेट कारवाईच्या अनेक तऱ्हा समोर आल्यानंतर पोलिसांनी आता रस्त्यावरही दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला आहे. प्रबोधनात्मक उपाययोजनांमुळे शहरात हेल्मेट परिधान करून दुचाकी चालविण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु, काही अंशी वाहनधारक या नियमाचे पालन करीत नाही. त्यामुळे मंगळवारपासून विविध भागांत विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे साहाय्यक पोलीस आयुक्त सीताराम गायकवाड यांनी म्हटले आहे.

पहिल्यांदा ५००, दुसऱ्यांदा हजार रुपये दंड

शहरात विनाहेल्मेट वाहनधारकांवर मोटार वाहन अधिनियमान्वये ५०० रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. संबंधित दुचाकीस्वाराने दुसऱ्यांदा या नियमाचे उल्लंघन केल्यास एक हजार रुपये दंड आणि तीन महिन्यांसाठी वाहन चालविण्याचा परवाना निलंबनाची कारवाई करण्यात येईल. दंड न भरल्यास वाहन ताब्यात घेतले जाणार आहे. चौकट महिन्याला पाच हजार दुचाकीस्वारांना समुपदेशन विनाहेल्मेट भ्रमंती करणाऱ्या दुचाकीस्वारांना पोलिसांकडून १२ ठिकाणी समुपदेशन केले जाते. या वेळी मोटार वाहन नियमांच्या पुस्तकाचे वाचन, परीक्षा घेतली जाते. १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२१ या दोन महिन्यात तब्बल १० हजार ५६१ विनाहेल्मेट दुचाकीस्वारांचे समुपदेशन करण्यात आले. म्हणजे महिन्याला सरासरी पाच हजारच्या आसपास विनाहेल्मेट दुचाकीस्वार आढळत आहेत.

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Penalties non helmet riders action ysh