वेगवेगळ्या उपक्रमात पोलीस यंत्रणा मग्न असल्यावरून ओरड होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर, पोलीस सक्रिय झाले असून विविध मोहिमा हाती घेत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत चोरीच्या तीन गुन्ह्य़ांची उकल झाली असून त्यामध्ये चार लाखांहून अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहर पोलिसांच्या पुढाकारातून नो हॉर्न डे, हेल्मेट सक्ती, वाहतूक नियमांचे प्रबोधन करण्यासाठी वेळोवेळी मोहिमा राबविल्या गेल्या. यासाठी संपूर्ण फौजफाटा रस्त्यावर उतरविण्यात आला. पोलीस यंत्रणा अशा उपक्रमांमध्ये मग्न असताना त्याचा फायदा गुन्हेगारी मंडळींकडून घेण्यास सुरुवात झाली. पंधरा दिवसांत पोलिसांना मारहाण करण्याच्या चार घटना घडल्या. बेशिस्त वाहनधारकांविरुद्धच्या कारवाईत मुजोर रिक्षाचालकांकडे दुर्लक्ष केले जात असल्याची भावना उमटली. त्यात एकाच दिवसात सोनसाखळी चोरीचे पाच ते सहा प्रकार घडल्याने महिला वर्गात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. यावरून ओरड होऊ लागल्यावर पोलीस यंत्रणा अकस्मात सक्रिय झाल्याचे दिसत आहे. मुजोर रिक्षाचालक आणि गुन्हेगारांची धरपकड करण्यास सुरुवात झाली आहे. गुन्हे शाखा युनिट दोनने केलेल्या कारवाईत घरफोडीचे तीन गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळाले. संशयित नीलेश वायाळला (२०) चुंचाळे परिसरातून अटक करण्यात आली.

संशयित व त्याच्या तीन साथीदारांनी इंदिरानगर, गंगापूर रोड येथे चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून १६ वेगवेगळ्या कंपन्यांचे भ्रमणध्वनी, एक एलसीडी टीव्ही, सोने-चांदीचे दागिने, लॅपटॉप, डिजिटल फोटो फ्रेम, चोरीच्या दोन दुचाकी असा चार लाख ३५,६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी संशयितांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने नीलेशला मंगळवापर्यंत पोलीस कोठडी सुनावली. अन्य दोन अल्पवयीन संशयितांची उंटवाडीच्या निरीक्षणगृहात रवानगी करण्यात आली. संशयित हे उघडय़ा दरवाजा वा खिडकीतून भ्रमणध्वनी चोरी व दुचाकी चोरी करण्यात तरबेज आहेत. त्यांच्याकडून अन्य गुन्ह्य़ांची उकल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गंगापूर रोड भागात सोनसाखळी लंपास करणाऱ्या संशयितांना पकडण्यात आले. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने संशयित समीर इराणी (३५) याला आंबिवली येथून अटक केली. संशयित दुचाकीवर येऊन शहरात सोनसाखळी लंपास करत असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, नामचिन गुंड शेखर निकम (रा. फुलेनगर) व त्याच्या चार साथीदारांवर पंचवटी पोलीसांनी मोक्कांतर्गत कारवाई केली. शेखरवर नऊ गुन्हे असून त्याचा साथीदार विशाल भालेराववर १४, संतोष पवार याच्यावर एक, केतन निकम याच्यावर एक आणि संदीप पागदरे याच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारांविरोधात कारवाई करताना पोलिसांनी मुजोर रिक्षाचालकांकडे मोर्चा वळविला. बेशिस्त रिक्षाचालकांविरुद्ध विशेष मोहिमेंतर्गत कारवाई केली जात आहे. त्याअंतर्गत ११०हून अधिक रिक्षा जमा करण्यात आल्या. परवाना, फिटनेस, परवाना आदींची पडताळणी करून ऑनलाइन नोंदणी करत चालकांना स्टिकर वाटप करण्यात आले आहे. आतापर्यंत तीन हजार ५२४ स्टिकर्सचे वाटप करण्यात आले. गणवेश परिधान न करणाऱ्या ९७ रिक्षाचालकांकडून २०,७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police active against criminals indiscipline disobedient rickshaw driver
First published on: 19-09-2017 at 01:35 IST