लोकसत्ता प्रतिनिधी, नाशिक

करोना विषाणुचा उद्रेक झालेल्या मालेगावमध्ये अडीच महिन्यांपासून तीन हजाराहून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी सेवा बजावत आहेत. यातील १७० पोलीस करोना मुक्त झाले असून अद्याप काही कर्मचारी करोनाग्रस्त आहेत. तर विश्रांती मिळावी यासाठी काहींना विलगीकृत करण्यात आले आहे. विलगीकरणातील पोलीस कर्मचाऱ्यांची  जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांनी भेट घेतली. बरे झालेले पोलीस पुन्हा नव्या उत्साहात रुजू होत असतांना जिल्हा ग्रामीण पोलिसांकडून त्यांची काळजी घेतली जात आहे.

मालेगावमध्ये करोना विषाणूचा फैलाव मोठय़ा प्रमाणावर झाला. गल्ली बोळात विखुरलेली गर्दी रस्त्यावर येऊ नये यासाठी ग्रामीण पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केले. जिल्हा पोलिसांसह नाशिक पोलीस, राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून राज्य राखीव दलाच्या तुकडय़ा बोलावण्यात आल्या. सर्वाच्या एकत्रित प्रयत्नाने या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आले. जोखमीच्या भागात पोलीस सातत्याने फिरल्याने त्यांना करोनाची लागण झाली. या धोकादायक परिस्थितीला तोंड देतांना तीन पोलिसांना आपला जीव गमवावा लागला. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये काही अंशी भीती पसरली. या पार्श्वभूमीवर मालेगाव परिसरात अडीच महिन्यांपासून सेवा बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना विश्रांती मिळावी यासाठी त्यांना सध्या नाशिक येथील आडगाव परिसरातील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या  कर्मचाऱ्यांना करोनाची लागण नसली तरी त्यांनी थेट कुटूंबियांमध्ये मिसळणे धोकादायक ठरू शकते. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना १४ दिवसांसाठी विलगीकरण करण्यात आल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक  डॉ. आरती सिंह यांनी सांगितले.

या केंद्राला भेट देत डॉ. सिंह यांनी करोनाच्या अनुषंगाने पोलीस कर्मचाऱ्यांनी काय काळजी घ्यावी, सुरक्षित अंतर कसे ठेवावे, दैनंदिन आहार कसा घ्यावा, संसर्ग होण्यापासुन संरक्षण कसे करावे तसेच रोगप्रतिकारशक्ती क्षमतेत वाढ कशी करावी, याबाबत माहिती दिली. धोकादायक  परिसरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविणे, त्यांच्या मनातून करोनाची भीती घालविणे अशा प्रकारे समुपदेश करण्यात आले. करोना संकटाशी जीवाची बाजी लावत लढा देणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे डॉ. सिंह यांनी अभिनंदन केले. तसेच मालेगावमध्ये चोखरित्या बंदोबस्त पार पाडणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामाबद्दल बक्षिसाने गौरविण्यात आले .

आडगांव येथील पोलीसांसाठी असलेल्या अलगीकरण केंद्रातील पोलीस कर्मचाऱ्यांशी संवाद साधतांना जिल्हा पोलीस अधिक्षक

डॉ. आरती सिंह. समवेत अन्य पदाधिकारी.