पोलीस दलात ३९ वर्षे सेवा करताना समता, बंधुता, शांतता आणि सलोखा कायम ठेवत पंचवटीकरांच्या हृदयावर राज्य करणारे साहाय्यक उपनिरीक्षक सय्यद मुझ्झफर अन्वर यांच्यासारखे अधिकारी दुर्मीळच. चार कुंभमेळ्याच्या यशस्वी नियोजनाची जबाबदारी त्यांनी पार  पाडली आहे. सिंहस्थात आलेल्या अनुभवावर आधारित एखादे पुस्तक त्यांनी लिहावे, अशी सूचना आमदार बाळासाहेब सानप व्यक्त केली. सय्यद यांनीही त्यास तत्काळ होकार दर्शविला.

एखादा सनदी किंवा उच्चस्तरीय अधिकारी निवृत्त झाला की त्यानिमित्त आयोजित सोहळ्यात सर्वजण स्वत:ला झोकून देताना दिसतात. परंतु साहाय्यक उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी निवृत्त झाल्यानंतर एखाद्या बंद खोलीत किंवा फार तर २५ ते ३० लोकांच्या सान्निध्यात त्यांचा सत्कार झाल्याची उदाहरणे आहेत. साहाय्यक उपनिरीक्षक सय्यद मुझ्झफर अन्वर यांच्या नागरी सत्कार सोहळ्यास आमदार, महापौरांसह मोठय़ा प्रमाणात ज्येष्ठ अधिकारी आणि दोन ते तीन हजारांचा जनसमुदाय जमणे, हे सारे स्वप्नवत वाटत असले तरी ते प्रत्यक्षात उतरले. पंचवटी शांतता समिती तसेच पंचवटीचे नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आमदार सानप यांनी अन्वर यांच्या कार्याचे कौतुक केले.

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील हेही सोहळा बघून चकित झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्माकर पाटील, भाजप महानगर सरचिटणीस उत्तम उगले, अनिल वाघ, सचिन डोंगरे, प्राचार्य हरिष आडके यांनीही आपले अनुभव मांडले. सय्यद यांच्या शिक्षक मुलीने मनोगत व्यक्त केले. साधू, संत, महंत, पंचवटी परिसरातील बहुसंख्य नगरसेवक आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शाहू खैरे, संजय बागूल यांच्यासह सय्यद यांच्या काळातील समकालीन अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते. सत्कारास उत्तर देताना भावूक झालेल्या सय्यद यांनी नाशिककरांनी आपल्यावर खूप प्रेम केल्याचे सांगितले. निष्ठेने काम केल्याने आजचा सत्कार म्हणजे त्या कामाची पावती असल्याचे सांगितले.