पोलीस आयुक्तांकडून कारवाईचा इशारा
विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पोलीस आयुक्तालयाकडून राजकीय पाश्र्वभूमी असलेल्या, परंतु मालमत्ता तसेच अन्य गुन्हे दाखल असलेल्या दीड हजार लोकांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांच्यावर वेगवेगळ्या कायद्यान्वये कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी दिला.
आतापर्यंत १० जणांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. सातपूर परिसरातील सराईत गुन्हेगार विशाल सांगळे यास ‘एमपीडीए’ कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यात आले. सांगळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यापुढेही राजकीय पाश्र्वभूमी असलेल्या गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्त नांगरेपाटील यांनी दिला.
ज्यांच्याविरुद्ध दोन किंवा अधिक गुन्हे असतील अशा ४१ आरोपींविरुद्ध हद्दपारीची कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त हद्दीत बेकायदेशीरीत्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध २५ गुन्हे दाखल असून बेकायदेशीररीत्या धारदार शस्त्र बाळगणाऱ्या १५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.