बेकायदेशीर खासगी सावकारीच्या माध्यमातून भगुर-पांढुर्ली रोड परिसरातील संशयिताने आपल्यासह नाणेगाव, दोनवाडे, वडगाव, िपगळा, विंचुरी, पांढुर्ली, बेलू, धामणगाव आदी गावांमध्ये अनेकांची फसवणूक करत जमिनी व मालमत्ता स्वत:च्या
नावे केल्याची तक्रार पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे. या संदर्भात वारंवार तक्रार देऊनही संबंधिताविरोधात कारवाई होत नसल्याची तक्रार दामू गायकवाड यांनी केली.
राहुरी भगूर येथील खासगी सावकाराकडून आपण तीन वर्षांपूर्वी अडीच लाख रुपये कर्ज घेतले होते. त्याबदल्यात दरमहा दहा हजार रुपये व्याजाची रक्कम दिली जात होती. ही रक्कम देण्याच्या मोबदल्यात सावकाराने सुरक्षिततेसाठी आपले घर स्वत:कडे गहाण ठेवून घेतले. हा संपूर्ण व्यवहार पूर्ण करताना संशयिताने आम्हाला विश्वासात घेऊन बँकेत कर्ज काढण्याचा सल्ला दिला. त्यानुसार आपल्या मुलाची स्वाक्षरी घेऊन साडेतेरा लाखांची रक्कम सावकाराने स्वत:च्या खात्यात परस्पर जमा करून घेतली. या फसवणुकीसंदर्भात डिसेंबर २०१५ मध्ये सहकार खात्याकडे दाद मागितली होती. त्याआधारे या विभागाने संबंधिताच्या घरात कागदपत्रांची छाननी केली; परंतु कोणतेही संशयास्पद कागदपत्र, चिठ्ठी वा पुरावे आढळून आले नसल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले. संबंधित सावकार व सहकार विभागाने आपली फसवणूक केल्याप्रकरणी आपण सहकार विभागाच्या आयुक्तांकडे तक्रार केली. त्याचा राग येऊन सावकाराने आपणास भ्रमणध्वनीद्वारे धमकी दिली. त्याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केल्याचे गायकवाड यांनी निवेदनात म्हटले आहे. या घटनाक्रमानंतर सावकार व त्याच्या साथीदारांनी पाथर्डी फाटा रस्त्यावर अडवून शिवीगाळ केली. त्या प्रकरणी आपण इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
सावकाराविरुद्ध वारंवार तक्रार अर्ज करूनही पोलीस यंत्रणा दखल घेण्यास तयार नाही. त्यास कंटाळून आपण संबंधित सावकाराच्या मालमत्तेची माहिती जमविली असता नाशिक, सिन्नर व इगतपुरी तालुक्यांतील काही गावांमध्ये संबंधिताने लोकांची फसवणूक करून मोठय़ा प्रमाणात मालमत्ता जमविल्याचे निदर्शनास आले. या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून आपल्यासह नाडल्या गेलेल्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी गायकवाड यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 28th Apr 2016 रोजी प्रकाशित
खासगी सावकाराकडून अनेकांची फसवणूक
राहुरी भगूर येथील खासगी सावकाराकडून आपण तीन वर्षांपूर्वी अडीच लाख रुपये कर्ज घेतले होते.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 28-04-2016 at 00:26 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Private money lenders fraud in nashik