संपर्कप्रमुखांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन प्रकरण
बंडखोरी करणाऱ्यांना शिवसेनेत प्रवेश दिल्याच्या निषेधार्थ संपर्क प्रमुखांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करणाऱ्या आठ शिवसैनिकांवर हकालपट्टीचा बडगा उगारतानाच शिवसेनेने संबंधितांच्या सुटकेसाठी पोलीस ठाण्यात जाणारे पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. बडगुजर यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यास त्यांच्यावरही शिस्तभंगाच्या कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.
महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, विविध राजकीय पक्षांतून शिवसेनेत येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्याअंतर्गत विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणारे नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांना पक्षात पुन्हा प्रवेश देण्यात आला. स्थानिकांना विश्वासात न घेता बंडखोरी करणाऱ्यांना पक्षात प्रवेश दिल्याच्या निषेधार्थ बुधवारी सिडकोतील पदाधिकाऱ्यांनी जिल्हा संपर्क प्रमुख अजय चौधरी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले होते. या घटनेची गंभीर दखल घेत गुरुवारी जिल्हाप्रमुख विजय करंजकर आणि महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांच्या उपस्थितीत स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. नाशिक शहर व जिल्ह्यात शिवसेनेला सुगीचे दिवस आले आहेत. पक्षात कोणाला सामावून घ्यायचे, हा पक्षप्रमुखांचा निर्णय असतो.
पक्षाचा विस्तार करण्यासाठी प्रमुखांकडून योग्य ते निर्णय घेतले जातात. असे असताना स्वत:च्या फायद्यासाठी संबंधित शिवसैनिकांनी पक्षप्रमुखांच्या निर्णयाला विरोध दर्शविला. असे प्रकार शिवसेना खपवून घेणार नसल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

‘सुटका करणे म्हणजे समर्थनच’
शिवसैनिकांच्या सुटकेसाठी नगरसेवक बडगुजर हे अंबड पोलीस ठाण्यात गेले होते. यावरून त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. संबंधितांना सोडविण्यासाठी जाणे म्हणजे एक प्रकारे त्यांच्या कृत्याचे समर्थन करण्यासारखे आहे. या बाबत समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्यास त्यांच्यावरही शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, सिडकोत घडलेल्या प्रतिकात्मक पुतळा दहन आंदोलनाशी आपला कोणताही संबंध नाही. तसेच पोलीस ठाण्यात जाऊन आपण आंदोलकांची सोडवणूकही केली नसल्याचे स्पष्टीकरण सुधाकर बडगुजर यांनी दिले आहे. पुतळा दहनाचे आंदोलन आपल्या संपर्क कार्यालयाजवळ झालेले नाही. शिवसेनेशी आपण कायम एकनिष्ठ असून पक्षातील प्रतिस्पर्धानी आपणास यात गोवण्याचे षडयंत्र रचल्याचे बडगुजर यांनी म्हटले आहे.