|| अनिकेत साठे

मध्यवर्ती ठिकाणाऐवजी आता स्वागताध्यक्षांच्या शिक्षणसंस्थेला पसंती

नाशिक : करोना निर्बंध शिथिलीकरणामुळे ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची लगबग पुन्हा सुरू झाली असताना ऐन वेळी संमेलन स्थळात बदल करण्याची वेळ आयोजकांवर आली आहे. मध्यवर्ती ठिकाणाऐवजी आता हे संमेलन शहराच्या वेशीवरील भुजबळ नॉलेज सिटी म्हणजे संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्या शिक्षणसंस्थेच्या प्रांगणात करण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. स्थळबदलातून आर्थिक बचत साधली जाणार आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावर धुळ्याकडून नाशिक शहरात प्रवेश करताना वेशीवर आडगाव हा परिसर आहे. तिथे भुजबळ यांच्या शिक्षणसंस्थेची महाविद्यालये आहेत. संस्थेच्या आलिशान व चकचकीत वसतिगृहात खास पाहुण्यांची निवासव्यवस्था होईल, अशा २०० खोल्या आहेत. इतकेच नव्हे तर, या संस्थेपासून हाकेच्या अंतरावर समाज कल्याण विभागाचे एक हजार निवासी क्षमतेचे वसतिगृह आहे. बाहेरगावहून येणाऱ्या पाहुण्यांची एकाच ठिकाणी निवासव्यवस्था झाल्यास वाहतूक वा निवासव्यवस्थेचा आर्थिक भार कमी होईल, असा विचार या स्थळनिश्चितीमागे आहे. या परिसराची निमंत्रक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली.  संमेलन स्थळ  बदलावे लागल्याची माहिती आयोजकांनी अखिल भारतीय मराठी  साहित्य महामंडळाला कळविली आहे. त्यास महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी दुजोरा दिला.

आर्थिक बचत…

आधीची जागा मिळाली असती तरी महामंडळाचे पदाधिकारी अर्थात खास पाहुणे, संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक आदींची निवासव्यवस्था हॉटेलमध्ये करावी लागणार होती. संमेलनकाळात मान्यवरांच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र वाहनांची तजवीज करणेही ओघाने आलेच. त्यामुळे आयोजकांनी जिथे उत्तम प्रकारची निवासव्यवस्था होईल, या बाबींचा स्थळनिश्चिती करण्याकरिता विचार झाला.  

गोखले शिक्षणसंस्थेने वसतिगृह दिले जाणार नसल्याचे आधीच स्पष्ट केले होते. जिथे निवासव्यवस्था अधिक असेल अशा नवीन स्थळाचा विचार केला जात आहे. एक-दोन दिवसांत स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करून नव्या स्थळाबाबत अंतिम निर्णय होईल. – जयप्रकाश जातेगावकर (निमंत्रक, प्रमुख कार्यवाह)

कारण काय?

करोनामुळे स्थगित झालेल्या साहित्य संमेलनासाठी १९, २० आणि २१ नोव्हेंबर या नवीन तारखा निश्चित झाल्या आहेत. संमेलन स्थळ म्हणून आधी कॉलेज रोडवरील गोखले शिक्षण संस्थेचे प्रांगण निश्चित झाले होते; परंतु करोनाचे निर्बंध हटल्यानंतर महाविद्यालये सुरू झाली. या संस्थेच्या आवारात अनेक महाविद्यालये असून वसतिगृहात विद्यार्थी दाखल होत असल्याने संस्थेने जागा देण्यास असमर्थता दर्शविल्याचे सांगितले जाते.