scorecardresearch

उद्योजकाच्या बंगल्यावर दरोडा

चोरी, लूटमार अशा घटनांना आतापर्यंत सामोरे जाणाऱ्या सर्वसामान्य नाशिककरांना सोमवारी सातपूर येथील उद्योजक बापूशेठ नागरगोजे यांच्या बंगल्यावर सोमवारी सकाळी टाकण्यात आलेल्या दरोडय़ाने हादरा बसला.

सातपूर येथील उद्योजक बापूशेठ नागरगोजे यांच्या भगवान गड या बंगल्यावर चार जणांनी दरोडा टाकला. दरोडेखोरांनी घरातील सदस्यांना शस्त्राचा धाक दाखवीत पैसे शोधण्यासाठी घरातील सामान, कपडे अस्ताव्यस्त केले. (छाया- यतीश भानू)

साडेपाच लाखांचा मुद्देमाल लंपास; नाशिककरांमध्ये दहशत

नाशिक : चोरी, लूटमार अशा घटनांना आतापर्यंत सामोरे जाणाऱ्या सर्वसामान्य नाशिककरांना सोमवारी सातपूर येथील उद्योजक बापूशेठ नागरगोजे यांच्या बंगल्यावर सोमवारी सकाळी टाकण्यात आलेल्या दरोडय़ाने हादरा बसला. दरोडेखोर आता भरदिवसा मोठे सावज हेरू लागल्याचे या दरोडय़ावरून उघड होत असतानाच पोलिसांच्या मवाळ भूमिकेवरही टीका होऊ लागली आहे. सकाळी १० वाजेच्या सुमारास चारपेक्षा अधिक दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवत  दीड किलो सोन्यासह रोख रक्कम, अन्य सामान असा पाच लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. भरदिवसा उद्योजकाच्या घरी दरोडा टाकून गुन्हेगारांनी पोलिसांनाच आव्हान दिले आहे.

सातपूरच्या जाधव संकुल परिसरातील लाव्होटी मळा येथे उद्योजक बापूशेठ नागरगोजे यांचा भगवान गड हा बंगला आहे. सोमवारी बापूशेठ हे सकाळी १० वाजता घराबाहेर पडल्यानंतर थोडय़ाच वेळात बंगल्याच्या प्रवेशद्वारावर चार ते पाच संशयित आले. पिण्यासाठी पाणी पाहिजे, असे म्हणत त्यांनी बंगल्यात प्रवेश केला. त्या वेळी बंगल्यात नागरगोजे यांच्या पत्नीसह दोन सुना तसेच त्यांचा दीड वर्षांचा नातू होता. लहान मुलगा आजीच्या मांडीवर खेळत असताना संशयितांपैकी एकाने बाळाच्या अंगावर सुरा धरत घरातील महिलांवर जरब बसविण्याचा प्रयत्न केला; परंतु अशा बिकट परिस्थितीतही तीनही महिलांनी प्रतिकार सुरू केल्यावर संशयितांनी चिकटपट्टीच्या मदतीने महिलांचे तोंड, हात बांधत बंगल्यातील देवघरात बाळासह तिघींना कोंडले. एकाने त्यांच्यावर चाकूचा धाक दाखवत पहारा ठेवला. अन्य चार जणांनी महिलांच्या अंगावरील दागिने काढून घेत घरातील कपाटात, तिजोरीत ठेवलेली दीड लाखाची रक्कम, अन्य सोन्याचे दागिने असा पाच लाख ६५ हजारांहून अधिक मुद्देमाल ताब्यात घेतला. घरातील सामानाची नासधूस केली.

हातात आलेला मुद्देमाल पाहता चोरटय़ांनी बंगल्यात नाचत आनंद व्यक्त केला. दरोडेखोर निघून गेल्यानंतर दरोडय़ाची माहिती सातपूर पोलिसांना मिळाली. उपायुक्त विजय खरात, संजय बारकुंड, सातपूर पोलीस ठाण्याचे पथक आदी घटनास्थळी दाखल झाले. दरोडेखोरांचा मागोवा घेता यावा यासाठी श्वान पथक बोलविण्यात आले होते. सातपूर पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी या गुन्ह्याची उकल व्हावी यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह चार पथके तयार केली आहेत. दरोडेखोर हिंदूीतून बोलत होते, त्यांचा माग काढण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्याचे उपायुक्त खरात यांनी नमूद केले.

घरात सुरक्षिततेच्या उपायांची वानवा

सातपूर परिसरातील भगवान गड बंगला सेवासुविधांनी युक्त असला तरी सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीच खबरदारी घेण्यात आलेली नाही. बंगल्यात रोख रक्कम, दागिने, अन्य मौल्यवान सामान असताना या ठिकाणी सुरक्षारक्षक किंवा सीसीटीव्ही कॅमेरेही नाहीत. अन्य यंत्रणा कार्यान्वित नाही. याविषयी आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलिसांनी नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन केले आहे.

संशयितांकडून टेहळणी

दरोडा पडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत रहिवाशांशी चर्चा केली. त्या वेळी एका महिलेने दरोडेखोरांपैकी एकाला रविवारी रात्री बंगल्याच्या बाहेर फिरताना पाहिले होते, असे सांगितले. हा प्रकार त्यांनी घरातील अन्य सदस्यांना सांगितला असता तर आजची घटना टळली असती.

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Robbery entrepreneur bungalow terror residents police scared citizens ysh