रशियन दूतावासांतर्गत प्रदर्शन; नाशिक महापालिका यांच्यावतीने ५ ते ८ फेब्रुवारीदरम्यान आयोजन, विविध भाषाअभ्यास, सुसज्ज वाचनालय
मुंबईतील रशियन दूतावासांतर्गत रशियन विज्ञान आणि सांस्कृतिक केंद्र तसेच नाशिक महापालिका यांच्यातर्फे ५ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते होणार आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागातील महात्मा फुले कलादालनात हे प्रदर्शन होईल. या प्रदर्शनाच्या माध्यमातून भारत व रशिया यांचे संबंध अधिक दृढ होण्यास हातभार लागणार आहे.
या सोहळ्यास केंद्राचे संचालक व्ही. व्ही. दिमेंतीयेव्ह तसेच दूतावासातील इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यंदाच्या वर्षी भारत-रशिया राजनैतिक संबंधाला ११५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे या प्रदर्शनात भारत-रशिया या दोन्ही देशातील मैत्री संबंधांना उजाळा मिळणार आहे. तसेच रशियातील सैबेरिया ते कॉकेशिअस पर्वतराजी अशी वैशिष्टय़पूर्ण आकर्षक छायाचित्रे पाहण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे.
मुंबईत रशियन विज्ञान व सांस्कृतिक केंद्रामार्फत नेहमीच अशी प्रदर्शने भरवली जातात. विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले जाते. तसेच केंद्रात आधुनिक सुविधांनी समृद्ध रशियन भाषा विभाग, मराठी, रशियन, हिंदी, गुजराथी, इंग्रजी आदी भाषांतरित तसेच इतर पुस्तकांचे सुसज्ज वाचनालय, अभ्यासिका आहे.
प्रदर्शनाचा नाशिककरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी विद्या स्वर्गे-मदाने यांच्याशी ९९६९१०६२८२ या क्रमांकावर संपर्क साधावा.