महाविद्यालयांतील यंत्रे बंद अवस्थेत; प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार
महिलांची गरज लक्षात घेत वर्षभरात शाळा, महाविद्यालयांमध्ये सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग यंत्रे तसेच पॅडची विल्हेवाट लावण्यासाठी इनसेनिटर यंत्र बसविण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर पुढाकार घेतला जात आहे. यंत्र बसविल्यानंतर बहुतांश यंत्र बंद पडत आहेत. महाविद्यालयीन व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या अनास्थेमुळे हा प्रकार घडत आहे, अशा तक्रारी करण्यात येत आहेत.
प्रशासनाने महिला आणि बालकल्याण विभाग तसेच काही दानशूर व्यक्तींच्या मदतीने जिल्हा, तालुका, गाव पातळीवर मुली, युवती, महिलांसाठी ‘सॅनिटरी नॅपकिन’ची व्यवस्था वेंडिंग यंत्राच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली. त्यासाठी नाममात्र म्हणजे पाच रुपये शुल्क आकारण्यात आले. शहरातील अनेक महाविद्यालयांमध्ये ही व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली. प्रत्यक्षात मात्र शाळा स्तरावर अशी सोय उपलब्ध नाही. बहुतांश महाविद्यालयांमध्ये या यंत्रांची अवस्था बिकट असल्याचे आढळून आले आहे. विद्यार्थिनींमध्ये या यंत्रांच्या वापरासंदर्भात अनभिज्ञता आहे. याविषयी संबंधित यंत्रणेकडे विचारणा केली असता योग्य उत्तरे मिळत नसल्याची विद्यार्थिनीची तक्रार आहे. हं.प्रा.ठा. कला आणि रा.य.क्ष. विज्ञान महाविद्यालयातील मानसी चव्हाणने विद्यार्थिनी कक्षात सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग यंत्र तसेच इनसेनिटर यंत्र बसविण्यात आले असले तरी सॅनिटरी नॅपकिन कधीही उपलब्ध नसतात, असे सांगितले. गरजेच्या वेळी या यंत्राचा उपयोग होत नाही. इनसेनिटर यंत्र कायम बंद असल्याने कधीही त्याचा वापर करताना कोणी बघितले नाही. अनेकदा महाविद्यालयाच्या महिला प्रसाधनगृहात कचरापेटी नसल्याने वापरलेले पॅड सोबत न्यावे लागतात. जेव्हा महाविद्यालयात काही तपासणी होणार असते, अथवा समिती येणार असते. त्या वेळी ही यंत्रे सुस्थितीत ठेवण्यात येत असल्याकडे तिने लक्ष वेधले. यंत्र बंद असते अथवा रिकामे असते. त्या वेळी जास्तीचे पैसे देऊन पॅडची गरज भागवावी लागत असल्याचे न. ब. ठाकूर विधि महाविद्यालयाच्या मृणाल पाटीलने सांगितले. व्ही. एन. नाईक महाविद्यालयातील महिला शौचालये अस्वच्छ असून नाइलाज म्हणून विद्यार्थिनींना त्यांचा वापर करावा लागतो. प्रसाधनगृहात सॅनिटरी पॅड वेंडिंग यंत्र तसेच इनसेनिटर यंत्र लावलेले असून दोन्ही यंत्रे कुचकामी असल्याचे दिसते. त्यामुळे महाविद्यालयातील या यंत्रांवर अवलंबून न राहता प्रत्येक विद्यार्थिनी पॅड सोबत ठेवतात. महाविद्यालयात थेट तक्रार करण्यास मुली संकोचतात. त्यामुळे महाविद्यालयांचे फावते, अशी भावना काहींनी व्यक्त केली.
महाविद्यालयांच्या स्वच्छता गृहातील अस्वच्छता, सॅनिटरी नॅपकिनचा अभाव, विल्हेवाट लावण्याचे यंत्र खराब असल्याने विद्यार्थिनींना आरोग्यविषयक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अस्वच्छतेमुळे नैसर्गिक विधीस जाणे टाळले जाते किंवा नाइलाजाने स्वच्छतागृह वापरले गेले तर संसर्ग, त्वचा आजार होत असल्याचे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मनीषा जगताप यांनी निरीक्षण नोंदवले.
यंत्राची देखभाल नाही
महाविद्यालयातील सॅनिटरी पॅडच्या यंत्रावर ‘मशीन बंद आहे’ असे लिहिल्याने यंत्र वापरण्याचा संबंध येत नाही. यंत्राला लावलेल्या काचेतून आतील भाग दिसत असल्याने यंत्रात कधीही पॅड नसल्याचे लक्षात येते. तसेच पॅडचा दर्जा, आकार याबद्दल माहिती नसल्याने एखाद्यावेळी पॅड उपलब्ध असूनही वापरण्यास भीती वाटते. इनसेनिटर यंत्र तुंबलेले असल्यामुळे अनेक महिन्यांपासून बंद आहे. त्याची वेळोवेळी सफाई केली जात नसल्याचे के.टी.एच.एम. महाविद्यालयाच्या मनीषा पगारने सांगितले.