आखातातील जॉर्डन या देशात २६ मार्च ते १५ एप्रिल या कालावधीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रकला कार्यशाळांसाठी येथील प्रफुल्ल व राजेश या चित्रकार सावंत बंधूंना निमंत्रित करण्यात आले आहे.
जॉर्डनची राजधानी अमान येथील ‘स्ट्राटेजिक ग्राफिक डिझाइन कंपनी’चे ग्राफिक डिझायनर, चित्रकार व कर्मचाऱ्यांचे सृजनशील, दृष्टिकोन व कलात्मक तांत्रिक ज्ञान वृद्धिंगत होण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. जॉर्डनच्या नऊ शहरांमध्ये ही कार्यशाळा होणार असून त्यात अमान, पेलेस्टाइन, उमकॉईस, अज्लुन, जेराश, साऊथ जॉर्डन, मडबा, इरबेड आदी शहरांचा समावेश आहे. अमानमधील प्रसिद्ध कास्टेल माऊंटन, अल हुसैनी मोस्क, सिटी सेंटर, अशराफेह, रेन्बो स्ट्रीट या स्थळांचा समावेश आहे. पेलेस्टाइन शहरात जेरूसलेम नाब्लूस, रामअल्लाह ही ठिकाणे चित्रीत होणार आहेत. अज्लुन येथील ओल्ड मोस्क एरिया तर जेराश येथील सौंदर्यपूर्ण जेराश डाऊटाऊन तसेच साऊथ जॉर्डन येथील प्रसिद्ध पेट्रा सिटी, अल करक पुरातन किल्ला व त्या भोवतालचे मनोहारी शहर, इरबेड येथील क्लॉक टॉवर, इरबेड संग्रहालय आदी ठिकाणे चित्रकार सावंत बंधू २१ दिवसातील मुक्कामात चित्रबद्ध करणार आहेत. जलरंगाचे तंत्र व मंत्रही सावंत बंधू सर्वाना उलगडून दाखविणार आहेत. कार्यशाळेतील काही चित्रे जॉर्डनच्या कलात्मक दिनदर्शिकेवर तसेच काही पुस्तकांमध्येही समाविष्ट करण्यात येणार आहे. सावंतबंधूंना आजपर्यंत तुर्की, चीन, अल्बेनिया, मलेशिया या देशांनी चित्र प्रदर्शन तसेच कार्यशाळांसाठी आमंत्रित केले आहे.