नाशिक : पारा ३८.५ अंशावर पोहोचल्याने उन्हाची तीव्रता वाढत असताना ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकटही घोंघावू लागले आहे. येवला, सिन्नर आणि बागलाण तालुक्यात सात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पुढील काळात पाणीटंचाईची झळ वाढण्याची चिन्हे आहेत.
एप्रिल महिन्याच्या प्रारंभी पाऱ्याने ४० अंशाचा टप्पा गाठला होता. मंगळवारी ३८.५ अंश तापमानाची नोंद झाली. उष्णतेची लाट आल्यासारखी स्थिती आहे. सकाळी अकरानंतर उन्हाचे चटके बसायला लागतात. टळटळीत उन्हामुळे दुपारी बाजारपेठेतील गर्दी ओसरत आहे. टळटळीत उन्हाने आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची धास्ती व्यक्त होत आहे. उकाडय़ाने काहिली होत असताना ग्रामीण भागात अकस्मात खंडित होणाऱ्या वीजपुरवठय़ाचे संकट उभे ठाकले आहे.
विजेच्या वाढत्या मागणीमुळे कुठेही अकस्मात वीज भारनियमनाची टांगती तलवार आहे. थंड हवेचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकच्या तापमानात मागील काही वर्षांत वाढ होत असल्याचे दिसून येते. एरवी, ४० अंशाचा टप्पा मे महिन्यात गाठला जायचा. यावेळी महिनाभर आधीच ती पातळी गाठली गेली. या स्थितीत पुढील काळात पारा किती वर जाणार याकडे सर्वाचे लक्ष आहे. वाढत्या तापमानात ग्रामीण भागात पाणीटंचाईची झळ जाणवू लागली आहे. चालू वर्षांत पावसाचे प्रमाण चांगले होते. अगदी हिवाळय़ात बेमोसमी पावसाने हजेरी लावली होती. धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा आहे. त्यामुळे टंचाईची तीव्रता फारशी जाणवणार नसल्याची स्थिती होती. तथापि, ग्रामीण भागात पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे.
येवला तालुक्यात पाण्याचा पहिला टॅकर सुरू झाला. या भागात सध्या तीन टँकरने गाव व वाडय़ांना पाणी दिले जात आहे. तशीच स्थिती बागलाण व सिन्नर तालुक्यात असून तिथे प्रत्येकी दोन टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. पुढील काळात टँकरद्वारे पाणी देण्याची मागणी वाढण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, प्रशासनाने ग्रामीण भागातील संभाव्य टंचाईला तोंड देण्यासाठी ५७९ गावे व ९२२ वाडय़ा असे एकूण १५०१ गाव-वाडय़ांचा टंचाई कृती आराखडा तयार केलेला आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी ३१ गाव-वाडय़ांवरील नळ योजना पूर्ण करणे, २३७ गाव-पाडय़ांवर नवीन विंधन विहिरी, विहिरींची खोली वाढविणे, खासगी विहिरींचे अधिग्रहण आणि जिथे काहीच पर्याय नाही अशा ८३५ गाव-वाडय़ांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे.