scorecardresearch

दोन पदांवर कार्यरत असलेल्या वैद्यकीय शिक्षकांचा शोध

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न राज्यात एकूण ४०३ महाविद्यालये आहेत.

|| अनिकेत साठे

नाशिक: राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांत शिक्षक पदावर कार्यरत असणारे काही जण शासनात समुदाय आरोग्य अधिकारी (सीएचओ) म्हणूनदेखील कार्यरत असल्याचे उघड झाले आहे. शिक्षक आणि अधिकारी ही दोन्ही पदे पूर्ण वेळसाठी आहेत. संबंधितांना एकाचवेळी दोन्ही पदांवर कार्यरत राहता येत नाही. आरोग्य विद्यापीठाने वैद्यकीय महाविद्यालयातील कुणी शिक्षक त्या पदावर कार्यरम्त आहे की नाही, याची छाननी सुरू केली  आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न राज्यात एकूण ४०३ महाविद्यालये आहेत. तिथे वेगवेगळय़ा पदांवर साधारणत: १४ हजार ४३० शिक्षक काम करतात. विद्यापीठ कायद्यानुसार महाविद्यालयात पूर्णवेळ कार्यरत शिक्षकांना शिक्षक म्हणून ग्राह्य धरले जाते. असे असताना काही शिक्षकांनी राज्य शासनात समुदाय आरोग्य अधिकारी पदाची जबाबदारी स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. संबंधितांनी केवळ विद्यापीठच नव्हे तर शासनाची दिशाभूल केली. ही बाब लक्षात आल्यावर विद्यापीठ अभ्यास मंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याचे विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाचे प्रमुख डॉ. नितीन कावेरे यांनी सांगितले. एकाच वेळी दोन पदांवर कार्यरत शिक्षकांचा शोध घेण्यासाठी मंडळाने ठराव केला. ज्या शिक्षकांनी समूदाय आरोग्य अधिकारी पद स्वीकारले आहे, त्यांना महाविद्यालयात शिक्षक म्हूणून कार्यरत राहता येणार नसल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील कोणताही शिक्षक समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत नाही, याची खात्री करण्यास सांगण्यात आले आहे. महाविद्यालयीन स्तरावर सर्व शिक्षकांकडून याबाबत हमीपत्र घेण्यात येणार आहे. समुदाय आरोग्य अधिकारी पदासाठी आयुर्वेद, युनानी किंवा परिचारिका पदवी क्रमप्राप्त आहे. त्यामुळे असे प्रकार मुखत्वे या तीन शिक्षणक्रमांचे शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांमध्ये घडल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

आकृष्ट होण्याचे कारण काय ?

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापन करणाऱ्या वेगवेगळय़ा पदांवरील शिक्षकांना सातव्या वेतन आयोगानुसार दरमहा किमान ८० हजार ते कमाल दीड ते दोन लाखांपर्यंत वेतन असल्याचे सांगितले जाते. खासगी महाविद्यालयात मात्र विहित निकषानुसार वेतन मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. समुदाय आरोग्य अधिकारी पदासाठीचे वेतन लक्षात घेऊन काही शिक्षक त्या कामाकडे आकृष्ट झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. समूदाय आरोग्य अधिकारी पदासाठी आयुर्वेद, युनानी व परिचारिका शिक्षणक्रमाची पदवी बंधनकारक आहे. म्हणजे याच तीन अभ्यासक्रमांशी संबंधित काही शिक्षकांनी एकाचवेळी दोन पदांवर काम करण्याची किमया साधल्याचे दिसत आहे. गमतीचा भाग म्हणजे या पदासाठी इच्छुक डॉक्टरांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य विद्यापीठातर्फे समुदाय आरोग्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविला जातो. तो पूर्ण केल्यावर त्यांची समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती होते.

राज्यात समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नऊ हजार पदे

ग्रामीण व दुर्गम भागातील आरोग्य केंद्र, उपकेंद्र सक्षम करून तिथे विविध प्रकारच्या आजारांवर उपचार करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्रात जवळपास नऊ हजार समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची पदे आहेत. बहुतांश जिल्ह्यात ही नियुक्ती झाली असून काही भागांत ती प्रक्रिया प्रगतिपथावर आहे. त्याकरिता आयुर्वेद, युनानी आणि परिचारिका पदवी ही शैक्षणिक अर्हता आहे. कंत्राटी तत्त्वावरील हे पद असून २५ हजार रुपये वेतन आणि १५ हजार रुपये प्रोत्साहन भत्ता असे महिन्याला साधारणत: ४० हजार रुपये समुदाय आरोग्य अधिकाऱ्याला मिळतात.

वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षक समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून आढळल्यास अशा शिक्षकांवर कडक कार्यवाही करण्यात येईल. त्यांची शिक्षक म्हणून मान्यता रद्द करम्ण्यात येणार आहे. तसेच अशा शिक्षकांना कुठल्याही संलग्नित महाविद्यालयात यापुढे शिक्षक म्हणून मान्यता दिली जाणार नाही. – डॉ. कालिदास चव्हाण (कुलसचिव, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ)

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Search for medical teachers working in two positions cho teachers and officers akp

ताज्या बातम्या