scorecardresearch

नाशिक : खोटे आरोप करणाऱ्यांवर कारवाईची मागणी – ख्रिस्ती समाजाचा मूक मोर्चा

पोलीस आणि राज्य शासनाकडून ख्रिस्ती समाजावर अन्याय केला जात असल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला.

नाशिक : खोटे आरोप करणाऱ्यांवर कारवाईची मागणी – ख्रिस्ती समाजाचा मूक मोर्चा
नाशिक शहरात ख्रिस्ती समाजाच्या मूक मोर्चात सहभागी झालेले बांधव. मोर्चामुळे अनेक भागात वाहतूक कोंडी झाली.

देशभरात काही समाजकंटक ख्रिस्ती प्रार्थनास्थळ, सभांमध्ये शिरून दमदाटी करीत मोडतोड, जबरदस्तीने धर्मांतराचे खोटे आरोप, ख्रिस्ती विधींमध्ये अडथळे आणणे असे प्रकार करीत असल्याची तक्रार करीत नाशिक जिल्हा ख्रिस्ती समाजाच्यावतीने गुरूवारी शहरात मूक मोर्चा काढून कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. पोलीस आणि राज्य शासनाकडून ख्रिस्ती समाजावर अन्याय केला जात असल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला. मोर्चामुळे शरणपूर रोड, सीबीएस आणि त्र्यंबक रस्ता परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली.

हेही वाचा >>> जळगाव जिल्हा परिषदेचे ३३ कोटींचे शिलकी अंदाजपत्रकच आरोग्यासह पंचायत राज विकासासाठी सर्वाधिक तरतूद

ख्रिस्ती समाजाचे अध्यक्ष प्रवीण घुले, उपाध्यक्ष रुपेश निकाळजे, गिरीश भालतिडक आदींच्या नेतृत्वाखाली शरणपूर रस्त्यावरील संत आंद्रिया चर्चपासून मोर्चेकरी विविध फलक हाती घेऊन निघाले. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येणार नव्हता. मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला आपले निवेदन सादर केले. देशात सर्व जाती धर्मात शांतता व सौहार्दाचे वातावरण असायला हवे यासाठी मूक मोर्चाद्वारे भावना मांडण्यात आल्याचे मोर्चेकऱ्यांनी म्हटले आहे. ख्रिस्ती समाजाचे धर्मगुरू, धर्मभगिनी प्रचारक, धर्म संस्थांना लक्ष्य करून समाजकंटक कायदा हाती घेऊन दहशत पसरवित असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला. ख्रिस्ती समाजाची लोकसंख्या जनगणनेत कमी होत आहे. या स्थितीत जबरदस्तीने धर्मांतरण कुठे आहे, असा प्रश्न करीत ख्रिस्ती समाजाविरुध्द अशा आरोपाचे षडयंत्र रचणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. देशात आणि राज्यातही ख्रिस्ती समाजाविषयी द्वेषपूर्ण व संशयास्पद वातावरण तयार केले जात आहे. त्यामुळे नाईलाजास्तव रस्त्यावर उतरावे लागल्याचे मोर्चेकऱ्यांनी म्हटले आहे.

ख्रिस्ती प्रार्थनास्थळांमध्ये जबरदस्तीने शिरून पावित्र्य भंग करणाऱ्यांवर कारवाई करावी, ख्रिस्ती युवकांना रोजगार मिळवताना अडचणींना तोंड द्यावे लागत असून त्यासाठी प्रयत्न करावे, व्यवसाय व शिक्षणासाठी ख्रिस्ती समाजासाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी आदी मागण्या मोर्चेकऱ्यांनी निवेदनात केल्या.

हेही वाचा >>> धुळे : वीज कंपनीचे दोन अधिकारी लाच स्विकारताना जाळ्यात

शरणपूर रोड, त्र्यंबक रस्त्यावर वाहतूक कोंडी मोर्चात मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव सहभागी झाले होते. संत आंद्रिया चर्च येथून मोर्चाला सुरूवात झाली. कॅनडा कॉर्नर, टिळकवाडी, त्र्यंबक रोड, जलतरण तलावमार्गे मूकमोर्चाचा शरणपूर रस्त्यावरील संत आद्रिया चर्चेमध्ये समारोप झाला. मोर्चाचे स्वरुप अतिशय मोठे असल्याने उपरोक्त भागातील वाहतूक विस्कळीत झाली. सीबीएस, राजीव गांधी भवन, कॅनडा कॉर्नर मार्गावर वाहनधारक अडकून पडले. अनेकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब केला. शरणपूर, सीबीएस ते कॅनडा कॉर्नर आणि त्र्यंबक रस्त्याला येऊन मिळणाऱ्या मार्गावरील वाहतूक मोर्चामुळे विस्कळीत झाली.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-03-2023 at 17:09 IST