लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : गोवा राज्यातून विदेशी मद्यसाठ्याची महाराष्ट्रात होत असलेली तस्करी रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असून जिल्हा ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाईत ६१ लाख सहा हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागांतून गुटखा व मद्याची होणारी तस्करी रोखण्यासाठी पोलिसांच्या वतीने तीव्र स्वरूपात कारवाई करण्यात येत आहे. नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांना, मुंबई-आग्रा महामार्गाने नाशिककडून धुळ्याकडे जाणाऱ्या एका मालवाहतूक वाहनातून मोठ्या प्रमाणात मद्याची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली.

आणखी वाचा-भुजबळ यांना उमेदवारी दिल्यास महायुतीला सर्वत्र धोका, सकल मराठा समाजाचा इशारा

स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्या वतीने महामार्गावरील चांदवड तालुक्यातील सोग्रस फाटा परिसरात वाहनांची तपासणी करण्यास सुरुवात केली. एका वाहनात अमोनियम क्लोराईडसदृश पावडर असलेल्या मालाखाली गोवा येथे निर्मित मद्याचे ४४८ खोके आढळले. सुमारे ४३ लाख ८०० रुपयांचा मद्यसाठा, वाहन असा ६१ लाख सहा हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. बनावट कागदपत्रे चालक पद्मसिंग बजाड (३५, रा. सिडको) यांनी सादर केल्याने संशयिताला न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली