नाशिक : रणरणत्या उन्हाने नागरिक हैराण झाले असताना बुधवारी दुपारी वातावरणात अकस्मात बदल होऊन बहुतांश भागात ढग दाटल्याचे पाहायला मिळाले. मनमाड परिसरात अवकाळी पावसाचा शिडकावा झाला. नाशिक, नांदगाव, मालेगावसह अनेक भागांत ढगाळ हवामानामुळे अवकाळी पाऊस पुन्हा हजेरी लावतो की काय, अशी धास्ती पसरली. या बदलाने तापमानाचा पारा किंचितसा कमी झाला असला तरी उकाडा मात्र वाढला आहे.

पावसाळा संपल्यानंतर अवकाळी पावसाने ऐन थंडीत अधूनमधून हजेरी लावली होती. त्यामुळे उन्हाळय़ात त्याची पुनरावृत्ती होते की काय, अशी स्थिती बुधवारी निर्माण झाली. मागील काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता चांगलीच वाढत आहे. त्यामुळे दुपारी रस्त्यासह बाजारपेठांमधील वर्दळ ओसरते. बुधवारी सकाळपासून सर्वत्र ऊन होते. दुपारनंतर अचानक बदल होऊन ढगाळ हवामान तयार झाले. या बदलाने नाशिकचे तापमान जवळपास एक अंशाने कमी झाले. मंगळवारी ३८.१ अंशांवर असणारा पारा या दिवशी ३७ अंशांवर आल्याचे हवामानशास्त्र विभागाकडून सांगण्यात आले.

नाशिकप्रमाणे ग्रामीण भागात वेगळी स्थिती नव्हती. मनमाडमध्ये उष्णतेची लाट आली आहे. पारा ४० अंशांचा टप्पा ओलांडत आहे. रणरणत्या उन्हाने नागरिक हैराण झालेले असतानाच या परिसरात दुपारी मेघगर्जनेसह आभाळ भरून आले. काही वेळ तुरळक पावसाचा शिडकावा झाला. नाशिक शहरासह मालेगाव, नांदगाव आणि आसपासच्या तालुक्यांतही हवामान ढगाळ होते.

हवामान विभागाने पुढील तीन-चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. ती काही अंशी खरी ठरली. ढगाळ वातावरणामुळे उष्मा अधिकच वाढला. बदलत्या वातावरणाचा फटका कृषी क्षेत्राला मोठय़ा प्रमाणावर बसत आहे. या वर्षांच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. कांद्यालाही फटका बसला. आता पुन्हा अवकाळीच्या भीतीने शेतकरी धास्तावला आहे. हे बदलते वातावरण शेती पिकाला नुकसानकारक ठरणार आहे.