मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा; शिवसेनेच्याही तोफा धडाडणार
जायकवाडीला पाणी सोडल्यापासून ते मराठवाडा-विदर्भासंबंधीच्या विधानामुळे महिला मेळावा उधळण्याच्या घटनेपर्यंत मित्रपक्ष शिवसेनेसह मनसे, काँग्रेस व राष्ट्रवादीकडून सातत्याने टीकेचे धनी ठरलेल्या भाजपने आगामी महापालिका निवडणुकीत त्याचे मोल चुकवावे लागू नये म्हणून तयारी सुरू केली आहे. २ व ३ एप्रिल रोजी येथे आयोजित प्रदेश कार्यकारिणीची बैठक त्याचे उदाहरण ठरले आहे. गेल्या काही महिन्यांपासून सेनेसह विरोधकांनी विविध मुद्दय़ांवर राळ उठवत भाजपला जबाबदार धरले. या बैठकीद्वारे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आदींच्या माध्यमातून संबंधितांना प्रत्युत्तर देताना पक्षाचा खुंटा मजबूत करण्याची व्यूहरचना आखण्यात आली आहे. दुसरीकडे भाजप विरोधात आक्रमक झालेल्या शिवसेनेने नाशिकशी निगडित विषय वेगळ्या पद्धतीने मांडण्याचे संकेत दिल्यामुळे उभयतांमधील संघर्ष शिगेला पोहोचणार असल्याचे अधोरेखित झाले आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीप्रमाणे नाशिक महापालिका निवडणूक भाजप व सेना स्वतंत्रपणे लढणार आहे. गृहखाते हाती असणाऱ्या भाजपने त्या ठिकाणी सेनेच्या पदाधिकाऱ्यांना विविध प्रकारे अटकाव केल्याचे आरोपही झाले होते. स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात ठेवण्यासाठी दोन्ही पक्षांकडून आटोकाट प्रयत्न होत असून त्याची पुनरावृत्ती नाशिकमध्येही होत आहे. स्थानिक पातळीवर गेल्या काही महिन्यांपासून सर्वपक्षीयांकडून चाललेल्या भाजप विरोधाला शह देण्यासाठी भाजपने प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे श्री स्वामी नारायण मंदिरात आयोजन केले आहे. पहिल्या दिवशी प्रदेश कार्यकारिणीची तर दुसऱ्या दिवशी प्रदेश कार्यसमितीची बैठक होईल.
शनिवारी सायंकाळी सहा वाजता यशवंतराव महाराज पटांगणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे. सभा व बैठकीस मुख्यमंत्र्यांसह प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कृषिमंत्री एकनाथ खडसे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री गिरीश महाजन, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे संबोधित करणार आहेत. बैठकीस केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, हंसराज अहिर, पीयूष गोयल, महाराष्ट्राचे प्रभारी सरोज पांडे, मंत्रिमंडळातील सदस्य, सर्व खासदार व आमदार असे एकूण ९०० प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. राज्यात दुष्काळी स्थिती असल्याने बैठक अतिशय साधेपणाने करण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष आ. बाळासाहेब सानप यांनी दिली.
चार वर्षांनंतर प्रदेशस्तरीय बैठक नाशिकमध्ये होत आहे. वर्षभरावर आलेली पालिका निवडणूक आणि विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्याच्या उद्देशाने बैठक व जाहीर सभा घेऊन भाजपने तयारी सुरू केली आहे. काही महिन्यांपूर्वी न्यायालयाच्या आदेशानुसार मराठवाडय़ासाठी नाशिक जिल्ह्य़ातील धरणांमधून पाणी सोडण्यात आले. तेव्हापासून शिवसेनेसह पालिकेतील सत्ताधारी मनसेसह काँग्रेस व राष्ट्रवादी उपरोक्त निर्णयास भाजप जबाबदार असल्याची आगपाखड करत आहे. नाशिकमध्ये सध्या तीव्र टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
गंगापूर धरणात पुरेसे पाणी असल्याने कपात करू नये, असे पालकमंत्र्यांनी लेखी कळविले होते. नंतर त्यांच्यावर वाढीव पाणी देण्याची वेळ आली. तेव्हापासून म्हणजे मागील दोन ते तीन महिन्यांपासून पालकमंत्री नाशिकला फिरकलेले नाहीत. यावरून मनसेने भाजपवर शरसंधान साधले.

काही दिवसांपूर्वी महिला आयोगाच्या अध्यक्षांनी मराठवाडा व विदर्भासंदर्भात केलेल्या विधानाच्या निषेधार्थ शिवसैनिकी व महिला पदाधिकाऱ्यांनी भाजपचा कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न केला होता. या आंदोलकांवर दरोडय़ाचे कलम लावल्यावरून सेनेच्या मंत्र्यांनी नाशिकमध्ये येऊन मुख्यमंत्र्यांवर शरसंधान साधले. या एकंदर घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर, विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांना भाजपकडून आक्रमकपणे उत्तर देण्याची तयारी केली गेली आहे. केंद्र व राज्यात भाजप सरकारने केलेल्या कामांची माहिती देतानाच विरोधकांकडून सुरू असलेल्या अपप्रचाराला उत्तर दिले जाणार असल्याचे सानप यांनी सांगितले. बैठकीमुळे भाजपचे सर्व मंत्री, आमदार, खासदार नाशिकमध्ये येणार असल्याने ज्या प्रश्नांकडे मोर्चाद्वारे लक्ष वेधले गेले, ते विषय वेगळ्या पद्धतीने पुन्हा संबंधितांसमोर मांडण्याची तयारी शिवसेनेने केली आहे.