मेघालयच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रचारकांच्या एका पथकाने बागलाणमधील शेती आणि सिंचनाची समस्या तसेच आदिवासींच्या समस्या जाणून घेण्यासाठी बागलाण तालुक्याचा दौरा केला. अनेकांशी चर्चा करून माहिती जाणून घेतली. या दौऱ्याचा अहवाल थेट पंतप्रधान कार्यालयात सादर करण्यात येणार आहे.

बागलाण तालुका हा शेतीवर अवलंबून आहे. परिसरात हंगामपूर्व द्राक्ष, डाळिंब आणि कांदा ही मुख्य पिके. तसेच सिंचनाचे प्रश्न आणि आदिवासी बांधवांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मेघालयातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक जितेन खवई, अजय नाग दामूतमिकी डखार यांच्या पथकाने नुकताच दौरा केला. ब्राह्मणगाव, लाडूद, सटाणा बाजार समिती, मांगीतुंगी, साल्हेर परिसरास भेट दिली. यावेळी लाडूद येथे माजी आमदार दिलीप बोरसे यांची भेट घेत द्राक्ष, डाळिंब पिकाविषयी माहिती घेतली.

बाजारपेठ, बाजारभावाविषयी चर्चा केली. यावेळी बोरसे यांनी डाळिंब पिकावरील तेल्या रोगामुळे हे पीक नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याकडे लक्ष वेधले. ते वाचविण्यासाठी शासनाने प्रभावीपणे पावले उचलणे आवश्यक असल्याचे सांगितले. शेतकरी अनेक धोके सहन करून द्राक्ष पीक काढतात. मात्र पीक काढणीवर आले की, बांगलादेशची सीमा बंद केली जाते. परिणामी, द्राक्ष मातीमोल भावात विकले जाते. काही शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून फसवणूक केली जाते. यामुळे शेतकरी कर्जबाजारी होतो. यावर शासनाने उपाय करणे आवश्यक असल्याचे बोरसे यांनी निदर्शनास आणून दिले.

ब्राह्मणगावचे माजी सरपंच किरण अहिरे यांनी कांदा पिकाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडल्याचे सांगितले. प्रति क्विंटल किमान १५०० रुपये भाव मिळाला तर हे पीक शेतकऱ्याला परवडू शकते. बागलाण सिंचन योजनांच्या बाबतीत अद्याप पिछाडीवर आहे. शासनाने नारपारसारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविल्यास पाणी उपलब्ध होऊन शेतीच्या पाण्याची प्रश्न सोडविता येईल. या पथकाने आदिवासी बांधवांना शासनाच्या योजनांचा लाभ होतो की नाही, याबाबतही माहिती घेतली.