चारुशीला कुलकर्णी

लाल, गुलाबी रंगाची, गोड, आंबट चवीची स्ट्रॉबेरी म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. अशा स्ट्रॉबेरीचा हंगाम वाढत्या थंडीबरोबर बहरला असून लालचुटूक आरोग्यदायी स्ट्रॉबेरी जिल्ह्य़ातील सप्तशृंगी गड तसेच वणी-सापुतारा रस्त्यावर ठिकठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. स्ट्रॉबेरी विक्रीतून परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांना चांगल्यापैकी अर्थार्जन होऊ लागले आहे.

स्ट्रॉबेरी उत्पादनात अग्रेसर असलेल्या महाबळेश्वरबरोबरच नाशिक जिल्ह्य़ातील सुरगाणा, कळवण तालुक्यातील घाटमाथ्यावर लाल मातीत पिकणारी लालभडक, आंबट-गोड अशी स्ट्रॉबेरीची फळे वणी, सप्तशृंगी गड आणि सापुतारा रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात विक्रीसाठी दाखल झाली असून रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या भाविक आणि पर्यटकांना ती खरेदी के ल्याशिवाय राहावत नाही. सुरगाणा तालुक्यातील प्रामुख्याने घाटमाथ्यावरील नागशेवडी, घोडांबे, पोहाळी, सराड, चिखली, शिंदे, हतगड, बोरगांव, घागबारी, लिंगामा आदी भागांत तसेच कळवण तालुक्याच्या पश्चिम भागातील पळसदरचे खोरे, सुकापूर, देवळी कराड, खेकुडे, बोरदैवत, वडापाडा आदी गावांतील आदिवासी शेतकरी भात, नागली, मका, भुईमूग, कुळीद, उडीद, दादर, गहू या पारंपरिक पिकांसह आता शास्त्रशुद्ध पद्धतीने स्ट्रॉबेरीची बाग घेत आहेत. या भागात स्ट्रॉबेरीच्या फळांसाठी आवश्यक असलेले पोषक वातावरण, जमिनीचा पोत असल्याने या भागात सात ते आठ वर्षांपासून स्ट्रॉबेरी लागवडीचे प्रयोग यशस्वी होऊ लागले आहेत. या भागात दिवसेंदिवस स्ट्रॉबेरी लागवडीचे क्षेत्र वाढत आहे.

नगदी पीक असलेल्या स्ट्रॉबेरीमुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या हातात पैसा खेळू लागला आहे. मोठे शेतकरी हे एक किलो, दोन किलोचे खोके भरून मुंबई, सुरत, नवसारी, बिल्लीमोरा, वघई, भरूच, वाझदा येथे पाठवतात. काही शेतकरी जागेवरच परिसरातील व्यावसायिकांना स्ट्रॉबेरीची विक्री करतात. बहुतांशी शेतकरी हे स्वत:च स्ट्रॉबेरी पाटी किंवा खोक्यात भरून वणी, नांदुरी, सप्तशृंगी गड, सापुतारा रस्त्यांवरही ठिकठिकाणी छोटी-छोटी दुकाने उभारून स्ट्रॉबेरी विकताना दिसतात.

थंडी उपयुक्त

स्ट्रॉबेरी हे थंडीत येणारे फळ असल्याने त्याचा मुख्य बहर डिसेंबर, जानेवारी महिन्यांत असतो. स्ट्रॉबेरीचे एकूण सहा बहर येतात. सध्या बहुतांशी शेतकऱ्यांचा दुसरा बहर सुरू आहे. डिसेंबर, जानेवारी महिन्यांत सर्वाधिक स्ट्रॉबेरी बाजारात विक्रीसाठी येते. सध्या थंडीचे प्रमाण चांगले असल्यामुळे ती स्ट्रॉबेरी पिकासाठी उपयुक्त ठरत आहे. सध्या आकाराने मोठी आणि चवीला उत्तम स्ट्रॉबेरी येत असल्याने त्यास मागणी चांगली आहे. स्ट्रॉबेरीमध्ये ‘क’ जीवनसत्त्व मोठय़ा प्रमाणात असल्यामुळे दिवसभराच्या कामामुळे येणारा थकवा कमी होतो. त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्या कमी होत असल्याने त्वचा तजेलदार होते. तांबडय़ा रक्तपेशींची वाढ करण्यास मदत करतात. स्ट्रॉबेरी मेदरहित असल्याने वजनावर नियंत्रण मिळविण्यास फायदा होतो.