त्र्यंबक देवस्थानची मागणी 

नाशिक : राज्यात टाळेबंदीमुळे अद्यापही देऊळ बंद आहेत. या संधीचा फायदा घेत पुरातत्व विभागाने त्र्यंबकेश्वर देवस्थानात डागडुजीसह अन्य कामे करावीत, अशी मागणी त्र्यंबक देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आली आहे. संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप कामास सुरूवात झालेली नाही.

टाळेबंदीमुळे मंदिरांमध्ये बोटावर मोजण्या इतक्या मंडळींच्या उपस्थितीत पूजा, अभिषेक होत आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थान यापैकी एक. त्र्यंबक मधील भाविकांचा ओघ थांबलेला असतांना या संधीचा फायदा घेत पुरातत्व विभागाने मंदिराची देखभाल आणि सुरक्षेच्या दृष्टीने रखडलेली कामे पूर्ण करावी, असे स्मरणपत्र देवस्थानच्या वतीने पुरातत्व विभागाला देण्यात आले आहे. मंदिर पटांगणातील अनेक मूर्ती खंडित आहेत, श्री त्र्यंबकराजाच्या पिंडीलगत असलेल्या संगमरवरी पाळेची दुरूस्ती करण्यात यावी, मंदिराच्या दगडी बांधकामातील नक्षीकाम अनेक ठिकाणी तुटले आहे.

मुख्य मंदिराच्या कळसाजवळ धर्मध्वज लावण्याकरीता असलेल्या जागेची दुरूस्ती करावी, ठिकठिकाणी तुटलेल्या पायऱ्या, मंदिर पटांगणातील झाडांच्या कुंडय़ांची दुरूस्ती , अनावश्यक विद्युत तारा काढणे, मंदिरातील खिडक्यांच्या तुटलेल्या जाळ्या दुरूस्तीची गरज आहे. नंदी मंदिरासमोरील मुख्य मंदिराकडे प्रवेश करतेवेळी अनेक ठिकाणी पायऱ्या तुटक्या आणि गुळगुळीत झाल्या आहेत. उत्तर नगारखान्यातील कमानीच्या खांबाला तडे गेले असून त्याची दुरूस्ती करावी लागणार आहे.

पूर्व दरवाजा लगत असलेल्या दीपमाळेचे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे.

पोलीस प्रशासनाच्या सुचनेनुसार मंदिराच्या सुरक्षेसाठी चारही बाजूला कोटावर तारेचे कुंपण आवश्यक आहे. ठिकठिकाणी अग्नीशमन म्हणून पाण्याचे पाईप काढणे गरजेचे आहे. यासह पोलीस प्रशासन, गुप्तचर खाते, दहशतवाद विरोधी पथक यांच्याकडून काही सुचना करण्यात आल्या आहेत.

या कामासाठी पुरातत्व विभागाची परवानगी, सहकार्य अपेक्षित आहे. याबाबत देवस्थानच्या वतीने पाठपुरावा करूनही अद्याप विभागाने कुठल्याच प्रकारची कार्यवाही केलेली नसल्याचे देवस्थानने म्हटले आहे.