नाशिक : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलीफिल्म कंपनीत रविवारी सकाळी बॉयलरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत दोन महिला कामगारांचा मृत्यू तर, १७ कामगार जखमी झाले. मृत आणि जखमी कामगार हे परप्रांतातील असून ते कंत्राटी पद्धतीवर काम करीत होते, असे सांगण्यात आले.

कंपनीच्या एका विभागात आग लागल्याची माहिती मिळताच उर्वरित विभाग तसेच आवारात वास्तव्यास असणारे शेकडो कामगार सुखरूप बाहेर पडले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. आग विझवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व अग्निशमन केंद्रे तसेच ठाणे, भिवंडी येथील अग्निशमन दलाची मदत मागवण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत आग धुमसत होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक येथे येऊन जखमींची विचारपूस केली आणि नंतर दुर्घटनास्थळाची पाहणी केली. मृतांच्या वारसांना शासकीय मदत आणि या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशीची घोषणा त्यांनी केली.  नाशिक-मुंबई महामार्गावरील मुंढेगाव येथे जिंदाल समूहाचा पॉलीफिल्म निर्मितीचा कारखाना आहे. सुमारे सव्वाशे एकर क्षेत्रातील हा प्रकल्प विशिष्ट पॉलीफिल्म निर्मितीचे जगातील सर्वात मोठे उत्पादन केंद्र म्हणून ओळखला जातो. सकाळी दहाच्या सुमारास कारखान्यातील पॉली प्रॉडक्शन विभागात बॉयलरचा मोठा स्फोट झाला. त्याचे हादरे आसपासच्या गावांपर्यंत जाणवले. क्षणार्धात तो विभाग आगीने वेढला गेला. तेथे २० कामगार अडकले होते. सायंकाळपर्यंत १९ कामगारांना बाहेर काढण्यात आले. त्यातील दोन महिला कामगारांचा मृत्यू झाला. जखमींपैकी चार कामगारांची प्रकृती गंभीर आहे. इतर विभागातून बाहेर पडलेल्या शेकडो कामगारांना प्रशासनाने एका शासकीय आश्रमशाळेत स्थलांतरित केले. आगीचे लोळ दूरवरूनही दिसत होते. आगीचा रौद्रावतार पाहून नाशिक महापालिका, एमआयडीसी, नगरपालिका, लष्करी छावणी मंडळ, एचएएल आणि ठाणे व भिवंडी येथून अग्निशमन दलासह बंब (फोम टेंडर) मागविण्यात आले. लष्करी हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात आली.

builder mastermind behind robbery on college road
कॉलेज रोडवरील दरोड्यामागे बांधकाम व्यावसायिक सूत्रधार; गुंडांकडून वृध्द दाम्पत्यास मारहाण
Now women are also in the crime investigation team in the police stations of the Commissionerate
नाशिक : आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांमधील गुन्हे शोध पथकात आता महिलाही
Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे आदी दुर्घटनास्थळावरून सर्व नियोजन करीत होते. पालकमंत्री दादा भुसे यांनी सिल्लोड दौरा रद्द करून मुंढेगावकडे धाव घेतली. घटनास्थळी अग्निशमन दलांचे सुमारे २५ बंब कार्यरत होते. कारखान्यात साठवणूक केलेल्या ज्वलनशील रसायनांचे स्फोट होत असल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे अवघड झाले होते. सायंकाळी उशिरापर्यंत आग धुमसत होती.

मृतांच्या वारसांना पाच लाख

दुर्घटनेतील मृत कामगारांच्या वारसांना राज्य शासनाकडून प्रत्येकी पाच लाखाची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली. जखमींवर मोफत उपचार केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. जखमींची विचारपूस केल्यानंतर शिंदे यांनी मुंढेगाव येथे दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. जिंदाल कारखान्यातील आग भयंकर होती. आगीची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जखमींची नावे

जखमी झालेल्या कामगारांना नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामध्ये राकेश सिंग, गणेश यादव, हिरामण यादव, पबिता मोहंती, सत्यजीत कुमार, कैलास कुमार, श्याम यादव, श्रद्धा गोस्वामी, यतिशा कटीयार, पूजा सिंग, अब्बू तलीम, मनोज पाठक, लखन सिंग, गजेंद्र सिंग यांचा समावेश असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली.