दलालांचा न्यायालयात गोंधळ आणि घोषणाबाजी
गुंतवणूकदारांना कोटय़वधींचा परतावा देण्यात अपयशी ठरलेल्या मैत्रेय कंपनीच्या वर्षां मधुसुदन सत्पाळकर यांना शुक्रवारी येथील न्यायालयात हजर केले जात असताना कंपनीच्या सुमारे १५० दलालांनी त्यांच्या समर्थनार्थ न्यायालयाच्या आवारात घोषणाबाजी करत गोंधळ घातला. यावेळी संबंधितांनी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना धक्काबुक्कीही केली. न्यायालयाने सत्पाळकर यांची ८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
मैत्रेय रिअल्टर्स प्रा. लिमिटेड कंपनीचे होलाराम कॉलनीत कार्यालय आहे. गुंतवणूक योजनांद्वारे मिळणारे धनादेश वटत नसल्याने चार ते पाच महिन्यांपूर्वी अनेक गुंतवणूकदारांनी प्रथम कंपनीच्या कार्यालयात धाव घेतली. तेथे उडवाउडवीची उत्तरे मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे दाद मागितली होती. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात मैत्रेयच्या संचालकांविरुध्द गुन्हा दाखल करून सत्पाळकर यांना अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दलालांची अरेरावी
शुक्रवारी सत्पाळकर यांना न्यायालयात हजर केले तेव्हा कंपनीच्या दलालांनी गर्दी केली. या संपूर्ण प्रकारात सत्पाळकर यांचा कोणताही दोष नसून त्यांना जामीन मिळावा, अशी मागणी करीत त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर हे आंदोलन सुरू होते. यावेळी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना छायाचित्र घेण्यास मज्जाव करत धक्काबुक्की करण्यात आली. पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करूनही ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. या घडामोडींमुळे परिसरात गोंधळ उडाला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Varsha satpalkar arrested by police
First published on: 06-02-2016 at 01:47 IST