दोन वर्षांपासून लासलगाव रेल्वे स्थानकातून मुंबईला पाठविल्या जाणाऱ्या भाजीपाल्याची बंद असणारी सुविधा गुरुवारपासून पूर्ववत होत आहे. या संदर्भात खासदार डॉ. भारती पवार यांनी भुसावळच्या रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केली. सकारात्मक चर्चा होऊन भाजीपाला पार्सल सुविधा पूर्ववत करण्यास हिरवा कंदील दाखविला गेला.

लासलगाव रेल्वे स्थानकातून मुंबईकडे अनेक वर्षांपासून भाजीपाला पाठवला जातो. परंतु दोन वर्षांपासून काही तांत्रिक कारणास्तव ही भाजीपाला पार्सल सुविधा सर्वच गाडय़ांसाठी बंद करण्यात आली होती. या संदर्भात परिसरातील शेतकरी, व्यापाऱ्यांनी तक्रार केली होती. खासदार पवार यांनी भुसावळ येथील रेल्वे महाप्रबंधक एम. के. गुप्ता आणि वाणिज्य विभागाचे प्रमुख विनोदकुमार यांच्याशी संपर्क साधून ही सुविधा सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याची सूचना केली होती. लासलगावच्या शिष्टमंडळाने भुसावळ येथे जाऊन रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करीत निवेदन दिले. चर्चेअंती गुरुवारपासून भाजीपाला लासलगाव रेल्वे स्थानकातून मुंबईकडे पाठविण्याचे मान्य करण्यात आले. सकाळच्या सत्रातील रेल्वेगाडय़ांनी भाजीपाला मोठय़ा प्रमाणात आणि सायंकाळी खवादेखील मुंबईकडे रवाना होण्यास आता सुरुवात होणार आहे. या सुविधेमुळे शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे खासदारांनी सांगितले.