नाशिक : राज्यातील विविध विद्याशाखांच्या ४०३ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न, समस्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्यावतीने ‘कुलगुरू का कट्टा’ हा अभिनव उपक्रम लवकरच सुरू होत आहे. या उपक्रमाची संकल्पना खुद्द कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी मांडली आहे.

महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाशी संलग्न राज्यात एकूण ४०३ महाविद्यालये असून विविध विद्याशाखेत हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी प्रथमच असा उपक्रम राबविण्यात येणार आहे.  डॉ. कानिटकर यांनी सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाच्या (पुणे) अधिष्ठाता म्हणून काम केले आहे. तिथे त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी असा उपक्रम राबविला होता.

आरोग्य विद्यापीठाच्या उपक्रमात विद्यार्थ्यांकडून इ मेलवर प्रश्न  मागविले जाणार आहेत. प्राप्त प्रश्नांमधून सर्वसमावेशक प्रश्नांबाबत कुलगुरू आभासी पद्धतीने आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. या उपक्रमासाठी आरोग्य विद्यापीठाने विद्यार्थ्यांना त्यांच्या तक्रारी, समस्या, सूचना महाविद्यालयांमार्फत पाठविण्यास सांगितले होते. तथापि, त्यास प्रतिसाद न मिळाल्याने आता विद्यार्थ्यांना आपल्या तक्रारी, सूचना थेट विद्यार्थी कल्याण विभागाच्या एसडब्लू अ‍ॅट एमयुएचएस डॉट एसी डॉट या मेलवर २५ एप्रिलपर्यंत पाठविण्यास सांगण्यात आले आहे.