‘आयएमए’ आणि सोशल नेटवर्किंग फोरमचा उपक्रम
गढईपाडा आणि तोरंगणला पाण्यासाठी स्वयंपूर्ण केल्यानंतर सोशल नेटवर्किंग फोरमने आता पेठ तालुक्यातील शेवखंडी, खोटरेपाडा आणि फणसपाडा या तीन गावांचा पाणी प्रश्न सोडविला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनची (आयएमए) नाशिक शाखा आणि त्वचारोग संघटनेने या उपक्रमाच्या खर्चाचा संपूर्ण भार उचलला. तीन गावांच्या जल प्रकल्पाचे लोकार्पण रविवारी सकाळी दहा वाजता शेवखंडी येथे पाण्यासाठी वणवण भटकंती कराव्या लागणाऱ्या ज्येष्ठ महिलांच्या हस्ते तसेच सोशल फोरम आणि आयएमएच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे.
पेठ तालुक्यात शेवखंडी, खोटरेपाडा आणि फणसपाडा या तीन गावांत अनेक वर्षांपासून पाण्याचे दुर्भिक्ष होते. गावातील विहिरी व हातपंपाचे पाणी आटले आहे. हंडाभर पाण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे दोन ते तीन किलोमीटर पायपीट करून डोक्यावर हंडे वाहून आणण्याशिवाय पर्याय नव्हता. ग्रामपंचायतीकडून राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीचेही पाणी आटल्याने पाण्याची टाकी व जलवाहिनीचा खर्च वाया गेला. तोरंगण प्रकल्पाची माहिती समजल्यानंतर या तीनही गावांतील ग्रामस्थांनी सोशल नेटवर्किंग फोरमचे संस्थापक प्रमोद गायकवाड यांची भेट घेतली. त्यानंतर फोरमने या गावांना भेट देऊन पाहणी केली असता पुढील एक ते दीड महिन्यात या गावांचा पाणी प्रश्न सुटू शकतो हे लक्षात आले. आधीच्या विहिरीऐवजी शाश्वत ठिकाणी विहीर खोदून गावापर्यंत जलवाहिनीने पाणी आणण्याचे ठरले. गावात बांधलेली टाकी आणि पाणी वितरण यंत्रणेचा वापर करून हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याचा निर्णय घेण्यात आला.
भूगर्भशास्त्राचे तज्ज्ञ डॉ. जयदीप निकम यांनी नदीवरील जमिनीची पाहणी करून योग्य ती जागा शोधली. अभियंता प्रशांत बच्छाव यांनी जलवाहिनी तसेच गावातील जलवाहिनी यंत्रणा उभारण्याची जबाबदारी स्वीकारली. उपरोक्त गावातील सरपंच व ग्रामस्थांनी श्रमदान कार्यात सहभागी होऊन जलवाहिनीसाठी चारी खोदली. खोदलेल्या विहिरीला मे महिन्यातही काठोकाठ पाणी लागल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे. या पद्धतीने सर्वाच्या एकत्रित प्रयत्नातून शेवखंडी, खोटरेपाडा आणि फणसपाडा या तीनही गावांना केवळ सहा लाखांत तेही केवळ दोन महिन्यांत कायमस्वरूपी पाणी पोहोचवण्याचा प्रकल्प साकारण्यात आला. निधी संकलनासाठी आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध भांडारकर, सचिव डॉ. प्रशांत देवरे, डॉ. समीर चंद्रात्रे आदी पदाधिकाऱ्यांनी ‘हंडाभर चांदण्या’ या दुष्काळग्रस्तांची कहाणी मांडणाऱ्या नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन केले. या माध्यमातून डॉक्टर सभासदांकडून तीन लाख ५० हजार रुपये आणि अन्य काही सभासद डॉक्टरांनी देणगी दिल्याने प्रकल्प जलदगतीने पूर्ण झाला. त्वचारोग संघटनेने त्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water projects inauguration in nashik
First published on: 29-05-2016 at 00:04 IST