महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदासाठी शुक्रवारी भाजपतर्फे सरोज अहिरे तर शिवसेनेच्या नयना गांगुर्डे यांनी अर्ज दाखल केले. उपसभापतिपदासाठी भाजपच्या कावेरी घुगे यांनी अर्ज दाखल केला. या समितीत भाजपचे बहुमत आहे, तरीदेखील शिवसेनेने उमेदवार दिला आहे.

महापालिका निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवणाऱ्या भाजपला रोखण्यासाठी सेना, काँग्रेस व राष्ट्रवादीकडून निकराचे प्रयत्न होत असले तरी संख्याबळाअभावी ते शक्य होत नसल्याचे दिसून येते. महिला व बालकल्याण समितीत तौलनिक बळानुसार भाजपचे पाच, शिवसेनेचे तीन तर राष्ट्रवादीचा एक असे सदस्य आहेत. सभापती व उपसभापतिपदासाठी १५ मे रोजी दुपारी ४ वाजता निवडणूक होणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. भाजपने सभापतिपदासाठी नाशिकरोडच्या नगरसेविका सरोज अहिरे व उपसभापतिपदासाठी कावेरी घुगे यांची नावे निश्चित केली.  दोन्ही उमेदवारांनी महापौर रंजना भानसी व इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केले. शिवसेनेने ही निवडणूक लढविण्याची तयारी केली. सेनेमार्फत नयना गांगुर्डे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी महानगरप्रमुख अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे आदी उपस्थित होते.

काही समित्यांची पुनस्र्थापना

महिला बालकल्याण सभापतिपदासाठी ज्येष्ठ महिला नगरसेविका फारशा उत्सुक नसतात. भाजपने सर्व सदस्यांना वेगवेगळ्या पदांवर स्थान देऊन त्यांचे समाधान करण्याचे धोरण ठेवले आहे. या पक्षात प्रथमच निवडून आलेल्यांची संख्या अधिक आहे. नगरसेवकांसाठी सत्ताधाऱ्यांनी विधि, शहर सुधार व आरोग्य समितीची पुनस्र्थापना करण्याचे निश्चित केले आहे. या तीन समित्यांवर नगरसेवकांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया गुरवारी सर्वसाधारण सभेत करण्यात येणार आहे. नवनिर्वाचित सदस्यांना सत्तेतील पदांची संधी देण्यासाठी सत्ताधारी शहर सुधार, विधि व आरोग्य व वैद्यकीय समिती  स्थापनेचा प्रस्ताव मांडणार आहेत.