18 April 2019

News Flash

सुपरफास्ट दैनंदिनीचं १९९१!

एकापाठोपाठ आलेल्या ‘डॉक्टर’, ‘चारचौघी’चे प्रयोग सुरू झाले..

भक्ती बर्वे-इनामदार आणि अविनाश मसुरेकर.. ‘रंग माझा वेगळा’च्या तालमीतील एक क्षण..

|| चंद्रकांत कुलकर्णी

एकापाठोपाठ आलेल्या ‘डॉक्टर’, ‘चारचौघी’चे प्रयोग सुरू झाले.. समीक्षक-प्रेक्षकांनी दोन्ही नाटकांचे उत्स्फूर्त स्वागत केले. या नाटकांच्या दोन्ही टीम्सनी एकमेकांची नाटकं पाहून प्रोत्साहन आणि पाठिंबा दिला. ‘चारचौघी’चा शुभारंभ १५ ऑगस्टला पुण्यात होता. तरीही ‘डॉक्टर..’ची सर्व टीम या प्रयोगाला आवर्जून उपस्थित राहिली. महेश मांजरेकर, मोहन गोखले आणि सर्वानीच ‘चारचौघी’वर तेवढंच मनापासून प्रेम केलं, कृतिशील पाठिंबा दिला. असं परस्पर प्रोत्साहनाचं वातावरण वेगळं काही करण्यासाठी फार पोषक असतं, हे आज वारंवार जाणवतं. या दोन नाटकांनी माझा आत्मविश्वास वाढवला. रोज वेगवेगळी जाणकार मंडळी प्रयोगांना येत होती, मन:पूर्वक दाद देत होती. त्यामुळे उत्साहही दुणावला. तातडीनं ‘पॉप्युलर प्रकाशन’नं या नाटय़संहिता प्रकाशित केल्यामुळंही एक वेगळं वातावरण निर्माण झालं. म्हणूनच चांगल्या नाटकाचे प्रयोग फक्त रंगमंचावरच होत नाहीत, तर त्याविषयीची प्रतिक्रिया, चर्चा वेगानं जनमानसात होते, हेच तर महाराष्ट्राच्या रंगभूमीचं आणि प्रेक्षकांचं वैशिष्टय़ आहे. बंद अंधाऱ्या नाटय़गृहात केवळ हा नाटय़ानुभव मर्यादित राहत नाही, तर बाहेरच्या जगात त्यातल्या आशय-विषयावर संवाद साधला जातो, मत-मतांतरे व्यक्त केली जातात. मनोरंजनापलीकडचा हा उद्देश चांगल्या नाटकाच्या पोटात नेहमीच दडलेला असतो.

एव्हाना १९९१ चा सप्टेंबर उजाडला आणि मग पुढच्या नाटकाचं नियोजन, चर्चा सुरू झाल्या. वसंत कानेटकरांनी एक नवं नाटक मोहन वाघांसाठी लिहिलं होतं- जे त्यांना ३१ डिसेंबरपूर्वीच ‘चंद्रलेखा’च्या वर्धापनदिनाला रंगमंचावर आणायचं होतं. अर्थात ३१ डिसेंबरसाठी आणखी दुसरं नवं नाटक करण्याचा त्यांचा पायंडा ते पाळणारच होते! ‘ही दोन्ही नाटकं तूच कर..’ असं ते म्हणाल्यावर मात्र मी गडबडलो. म्हणजे येत्या चार महिन्यांत दोन नवी नाटकं उभारायची होती. उत्साह आणि ऊर्जेला आता वेळापत्रकाची जोड गरजेची होती.

वाढदिवसाच्या समारंभातच आपले खरे आई-वडील वेगळेच आहेत हे कळल्यावर त्यांचा शोध घेणाऱ्या किशोरवयीन मुलाचा हा शारीरिक, मानसिक प्रवास होता. स्थळ-काळ-कृतीच्या सूत्रात कानेटकरांनी तो तीन अंकांत रेखाटला होता. पहिला अंक मुंबईत, तर दुसरा चक्क गोव्यात! दोन कुटुंबं, अस्तित्वाचा शोध आणि जगण्याची वेगळीच जाणीव. कानेटकरांनी सुरुवातीला एक लांबलचक, काव्यात्म शीर्षक या नाटकाला दिलं होतं, पण चच्रेअंती ‘प्रिय आईस..’ हा सुटसुटीत पत्राचा मायनाच अधिक अर्थ देऊन जाईल, हे त्यांनी स्वीकारलं!

पात्रयोजना करताना राहुल अवस्थी आणि राहुल मेहंदळे ही नव्या दमाची जोडी आणि बाळ धुरी, उपेंद्र दाते, जान्हवी पणशीकर, मेधा जांबोटकर ही अनुभवी फळी अशी रचना झाली. दोन्ही ‘राहुल’नी तालमींत खूप गमतीजमती करत तालमी प्रसन्न ठेवल्या. नाटकाची रचना गमतीशीर होती. कारण यात पहिल्या अंकातली बहुतेक सर्व पात्रं दुसऱ्या अंकात रंगमंचावर येतच नसत. कारण पुढचं कथानक घडत होतं ते होतं वेगळंच स्थळ! मात्र, तिसऱ्या अंकात एक नाटय़पूर्ण कल्पना सुचली आणि ही दोन्ही ‘स्थळं’ एका पत्राच्या माध्यमातून जोडून मी दृश्यस्वरूपात त्यांचा एकत्र वापर केला. त्यामुळं नाटय़पूर्णताही वाढली आणि सादरीकरणाला वेगळेपण प्राप्त झालं. शिवाय दोन्ही नेपथ्यांचे तुकडे एकत्र वापरून एक मिश्रदृश्य (सुपरइम्पोज) हा परिणाम साधता आला. त्यामुळे आपसूक वेगळ्या हालचाली दिल्या गेल्या.

प्रथेप्रमाणे ३१ डिसेंबरलाही ‘चंद्रलेखा’चं नवं नाटक येणार होतंच. यावेळेस डॉ. आनंद नाडकर्णीनी ते लिहिलं होतं.. ‘रंग माझा वेगळा’!  या नाटकाकरता एका इंग्रजी चित्रपटाच्या कथाबीजाचा वापर केला असला तरी डॉक्टरांनी त्यावेळी सायकोपॅथॉलॉजी आणि विस्कळीत व्यक्तिमत्त्व (Personality Disorder) याविषयीचं सुंदर भारतीयीकरण त्या नाटकात केलं होतं. एक लोकप्रिय लेखक आणि त्याची कट्टर ‘चाहती’ असलेली त्याची वाचक यांचं ‘जीवघेणं’ प्रेम इथं रहस्याच्या अंगानं रचलं होतं. लेखकानं निर्माण केलेल्या व्यक्तिरेखासुद्धा आपल्याच मर्जीनुसार लिहिल्या जाव्यात, हा तिचा अट्टहास. त्यासाठी तिचा अतिरेकी हट्ट, त्याकरता तिचे अतक्र्य प्रयत्न, प्रसंगी त्याला लाभणारा थरार अशी दृश्यं आणि गुंतागुंतीच्या व्यक्तिरेखांमुळे हे नाटक नटांसाठी आव्हानात्मक होतं. नाटकभर तशी दोनच पात्रं. तिसरं एक पात्र केवळ येऊन-जाऊन. कलाकार- अविनाश मसुरेकर आणि भक्ती बर्वे-इनामदार! डॉ. नाडकर्णीशी तेव्हा झालेल्या माझ्या परिचयाचं आज इतक्या वर्षांत खूप घट्ट मत्रीत रूपांतर झालंय. मानसशास्त्रज्ञ असलेला हा प्रसन्न माणूस लेखन, वाचन, सामाजिक उपक्रम, ट्रेनिंग प्रोग्राम्स यांत मन:पूर्वक डुंबून गेलाय. चर्चा झाल्यानंतर प्रचंड वेगानं नाटकातले बदल आणि प्रवेशांचं पुनल्रेखन करणारा हा विरळा नाटककार. रोज शेकडो माणसं ‘वाचणाऱ्या’ डॉक्टरांना नाटकातली ‘ती’ पात्रं निर्माण करणं खूप सहज शक्य झालं.

यानिमित्तानं पहिल्यांदाच भक्तीताईंबरोबर मी काम करणार होतो. त्यांनी डॉ. आनंद नाडकर्णी आणि माझ्याबरोबर खूप खोलात जाऊन चर्चा केल्या आणि खास त्यांच्या शैलीनं ही भूमिका सादर केली. अविनाश मसुरेकरांबरोबर त्यांनी आधीच एका नाटकात काम केलं होतं. त्यामुळे तालमीत खेळीमेळीचं वातावरण असायचं. काही तालमी भक्तीताईंच्या पुण्याच्या फ्लॅटमध्ये झाल्याचंही आठवतं. (गंमत म्हणजे हे घर जिथं होतं त्या रस्त्याचं नावही होतं- ‘भक्ती मार्ग’!)  व्यक्तिरेखेचे रंग हळूहळू खुलत जाण्याचा आलेख या नाटकात भक्तीताईंच्या वाटय़ाला आला होता. त्यात भावनांचे तीव्र उतार-चढाव होते, शाब्दिक चर्चा होती आणि शारीरिक आवेशही अपेक्षित होता. हे सगळंच त्यांनी फार नजाकतीनं पेश केलं. अविनाश मसुरेकरांनीही ही लेखक-चाहत्याची जुगलबंदी पेलून धरली. पुढे त्यांना काही वैयक्तिक अडचण आल्यामुळे ही भूमिका अविनाश नारकरने समर्थपणे उभी केली. खूप वेळ रिहर्सल्स न करताही भक्तीताईंसमोर तो ताकदीने उभा राहिला. कमी पात्रांचं नाटक असलं की दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांची जबाबदारी जास्त वाढते असं मला नेहमी वाटतं. कथानकात वस्तीपासून दूर असणारं गूढ घर, त्यातलं फर्निचर आणि विविध वस्तू, अंधार-प्रकाशाचा खेळ हे सगळंच नेपथ्य-प्रकाश-संगीतकारासाठी पोषक असंच होतं. मोहन वाघ आणि अनंत अमेंबल या जोडीनंही तोडीस तोड असं रंगमंचावरचं वातावरण मला आणि नटांना उपलब्ध करून दिलं. भक्तीताई ‘चंद्रलेखा’मध्ये काम करताहेत याचा एक वेगळाच उत्साह तालमी आणि प्रयोगांदरम्यान होता. पुढे ‘गांधी विरुद्ध गांधी’ नाटकापर्यंत भक्तीताईंशी माझी घनिष्ठ दोस्ती झाली. त्याविषयी नंतर कधीतरी लिहीनच.

जानेवारी १९९२ मध्ये ‘आविष्कार’ संस्थेतर्फे ‘विजय तेंडुलकर नाटक सोहळा’ आयोजित केला गेला. त्यात नवीन तरुण दिग्दर्शकांनी तेंडुलकरांचं नाटक स्वत:हून निवडायचं होतं आणि ‘अरविंद देशपांडे महोत्सवा’त त्याचा प्रयोग करणं अपेक्षित होतं. मलाही विचारलं गेलं. महेश मांजरेकरशी बोलून मी ‘अश्वमी थिएटर्स’तर्फे नाटक करायचं ठरवलं. ते नाटक होतं- ‘गिधाडे’!

डॉ. श्रीराम लागू, पं. सत्यदेव दुबे या मंडळींनी पूर्वी केलेलं हे नाटक मी फक्त संहितारूपात वाचलं होतं. अर्थात त्यावेळच्या प्रयोगादरम्यान झालेला वादंग, समीक्षकांनी त्याचं केलेलं विश्लेषण याविषयीही भरपूर वाचलेलं होतं. शिवाय या नाटकाचे अनेक किस्से, दंतकथाही ऐकिवात होत्याच. हे नाटक बसवताना एकाच वेळी दोन नाटकांच्या तालमी आणि दोन्हींचा स्वतंत्र प्रयोगविचार यांत माझी बरीच धावपळ झाली आणि त्याचा परिणाम ‘गिधाडे’च्या माझ्या पहिल्या प्रयोगावर झाला. शिवाय पहिल्या प्रयोगाला स्वत: विजय तेंडुलकर नाटय़गृहात उपस्थित राहणार होते याचंही दडपण होतंच. पुन्हा एकदा काही तालमी घेऊन आम्ही पुढचे प्रयोग खणखणीत केले. मात्र, ‘गिधाडे’ची प्रयोगसंख्या मर्यादितच राहिली.

तेंडुलकरांच्या ‘शांतता..’ आणि ‘गिधाडे’ या दोन्ही नाटकांत हिंसा, क्रौर्य, पशूत्व असणाऱ्या व्यक्तिरेखा आहेत. पण दोन्ही ठिकाणी रचना, संवाद, मांडणी मात्र अगदी भिन्न आहे. ‘शांतता..’मध्ये अप्रत्यक्ष हिंसा ठायी ठायी दडलेली दिसते, तर ‘गिधाडे’मध्ये ती पात्रांच्या रूपानं सतत अंगावर येते. ओबडधोबड व उग्र भाषा, शिव्या, द्वेष, मत्सर व्यक्त करत पात्रं एकमेकांना अक्षरश: ओरबाडतात. आज चटकन् विश्वासही बसणार नाही अशा अष्टपलू नटमंडळींबरोबर मला यानिमित्तानं काम करायला मिळालं : मोहन गोखले, माधुरी पुरंदरे, अजय फणसेकर, निर्मिती सावंत, अरुण नलावडे, चंदू पारखी! प्रत्येकाची समज वेगळी, सादरीकरणाची एरवीची पद्धतही निराळी; पण तेंडुलकरांच्या आकृतिबंधानं इथं सगळ्यांना एकत्र बांधून ठेवलं होतं. माधुरी पुरंदरेचं ‘रमा’ या पात्राचं प्रदीर्घ स्वगत आणि ‘रमाकांत’चा उत्तरार्धातला मोहन गोखलेनं उभा केलेला प्रसंग ही या नाटकातली माझ्यासाठीची कायमची आठवण! विशेषत: माधुरीने त्या स्वगतासाठी आवाज आणि पोताचा केलेला वापर, बधीर स्वरासाठी वापरलेला मध्यम आणि खर्ज स्वर हा एखाद्या शास्त्रीय गायनासारखा आजही कानात आहे. अरुण, निर्मितीनंही या वेगळ्या भूमिका जबरदस्त केल्या. एका प्रसंगात चंदू पारखीच्या पात्राला इतर चौघे अक्षरश: धक्काबुक्की करणे, त्याला उचलणे, पाडणे, मारहाण करणे अशा हालचाली आणि कृती जेव्हा रंगमंचावर करत तेव्हा त्यांचं क्रौर्य आणि चंदू पारखीचं कारुण्य अंगावर येत असे.

एकूणच १९९१ हे वर्ष माझ्यासाठी प्रचंड गतिमान असं राहिलं. वर्षभरात पाठोपाठ चार नाटकं, त्या संहितांवर चार नाटककारांसोबतच्या अखंड चर्चा, पुनल्रेखनाचे असंख्य ड्राफ्ट्स, प्रत्येक नाटकाच्या डिझाइनविषयी तंत्रज्ञांशी झालेला तपशीलवार संवाद.. आणि मुख्य म्हणजे त्या चारही नाटकांच्या रिहर्सल्स! आता विचार केला तर लक्षात येतं, की या वर्षभरात एकूण चार-पाच महिने तरी मी अक्षरश: तालमीच्या हॉलमध्येच होतो. या एकाच वर्षांत दिग्दर्शक म्हणून एकूण ३० हून अधिक अभिनेते-अभिनेत्रींबरोबर मी तासन् तास वावरलो, अनेक विषयांवर बोललो, प्रसंगी वाद-विवाद केले. तालीम ते पहिला प्रयोग या काळात सीनियर्सकडून मी बरंच काही शिकलो. तालमींमधले अंदाज, आडाखे प्रत्यक्ष प्रयोगात कसे खरे ठरतात, याचा अनुभव घेतला. नाटक या समूहकलेत प्रत्येक घटकाचं किती महत्त्वाचं योगदान असतं, याची प्रचीतीच जणू या काळात आली. या वर्षी शेवटी शेवटी वर्तमानपत्र उघडल्यावर आपल्याच चार-पाच नाटकांच्या जाहिराती एकत्र छापलेल्या बघतानाही वेगळंच काहीतरी वाटलं. खरी शाबासकी आणि प्रोत्साहन मिळालं ते ‘नाटय़दर्पण सोहळ्या’त! त्या वर्षी सर्वोत्कृष्ट नाटकाच्या पुरस्कारासाठी तीन नामांकनं जाहीर झाली. ती होती- ‘चारचौघी’, ‘डॉक्टर! तुम्हीसुद्धा..’ आणि ‘रंग माझा वेगळा’! सर्वोत्कृष्ट नाटक ठरलं- ‘चारचौघी’! लेखनाचा पुरस्कार मिळाला अजित दळवींना (‘डॉक्टर! तुम्हीसुद्धा..’), तर दिग्दर्शनाचा पुरस्कार मला (‘चारचौघी’)! लक्षवेधी अभिनेत्रीचा मान वंदना गुप्तेला मिळाला होता, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरल्या होत्या.. भक्ती बर्वे-इनामदार!

chandukul@gmail.com

First Published on July 8, 2018 5:39 am

Web Title: loksatta lokrang marathi articles 25